चित्रपट अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याची वैयक्तिक आणि व्यावसायिक लाईफ अशा दोन्हींमुळे चर्चेत आहे. कार्तिक आर्यनने आपल्या छोट्या कारकीर्दीत अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. आता कार्तिक लवकरच नेटफ्लिक्सवर (Netflix) ‘धमाका’ (Dhamaka) करणार आहे. अभिनेत्याचा 'धमाका' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. अशात ‘धमाका’च्या कराराविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सने 'धमाका'साठी 135 कोटींचा डील केला आहे. म्हणजेच नेटफ्लिक्स ‘धमाका’च्या हक्कासाठी 135 कोटी देणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे एखाद्या चित्रपटाला इतकी मोठी रक्कम अदा केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अमेझॉन प्राइम व्हिडिओने 'कुली नंबर 1' साठी 90 कोटींपेक्षा जास्त रक्कम दिली होती. यासह डिस्ने हॉटस्टारने अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' चित्रपटासाठी 110 कोटी दिले होते. अशाप्रकारे ‘धमाका’ हा चित्रपट आतापर्यंतचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकलेला बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे.
नुकतेच कार्तिक आर्यनने कोरोना विषाणूवर मात केली आहे. त्यानंतर आता तो अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्या वेळी कार्तिक कोरोनाला बळी पडला होता, त्यावेळी तो त्याच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. धमाकाचे शूटिंग कार्तिकने अवघ्या 10 दिवसात पूर्ण केले आहे. चित्रपटाचा बहुतेक भाग इनडोअर शूट झाला आहे. धमाकाच्या रिलीजची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही, परंतु आशा आहे की हा चित्रपट मे-जूनमध्ये रिलीज होईल. (हेही वाचा: कोरोना विषाणूवर मात केल्यानंतर अभिनेता Kartik Aaryan ने खरेदी केली Lamborghini Urus; किंमत फक्त 4.5 कोटी (See Video)
दरम्यान, 'धमाका' हा चित्रपट दक्षिण कोरियाच्या 'द टेरर लाइव्ह' चित्रपटावर आधारित आहे. 'द टेरर लाइव्ह’मध्ये हा-जंग-वूने मुख्य भूमिका साकारली होती. धमाकामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात, कार्तिक एक पत्रकार अर्जुन पाठकची भूमिका साकारणार आहे, जो शहर उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दहशतवाद्यांच्या दुष्ट हेतूविरूद्ध लढा देत आहे.