बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) बहुचर्चित सिनेमा 'छपाक' (Chhapaak Movie) आज (10 जानेवारी) प्रदर्शित होणार आहे. परंतु, या अगोदर दीपिकाने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आहे. यावेळी दीपिका पांढऱ्या रंगाच्या सुटमध्ये दिसली. छपाक सिनेमाचे शुटींग सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती.
हा चित्रपट विविध मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला. परंतु, हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर दीपिकाने दिल्लीत 'जेएनयू' हल्ला प्रकरणानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनातील दीपिकाची उपस्थिती पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं. तर काहींनी तिचं कौतुकही केलं. (हेही वाचा - Chhapaak: दीपिका पादुकोण आणि निर्मात्यांविरूद्ध कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार दाखल)
'छपाक' हा सामाजिक भान राखणारा चित्रपट असल्याने मध्य प्रदेश तसेच छत्तीसगडमध्ये तो 'टॅक्स फ्री' करण्यात आला आहे.
आज संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी आणि दीपिकाची मुख्य भूमिका आहे.