दिवाळीच्या धामधुमीनंतर आता साऱ्यांचे लक्ष लवकरच बॉलिवूड मध्ये पार पडणाऱ्या दोन मोठ्या शाही सोहळ्याकडे लागले आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी अखेर इटलीमध्येच विवाहबंधनात अडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाचं वेडिंग कार्ड चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. मात्र त्यामध्ये दीपिका आणि रणवीर कुठे लग्न करणार याबाबतचा खुलासा नव्हता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दीपिका आणि रणवीर रात्री उशिरा इटलीसाठी रवाना झाले . रात्री उशिरा दीपिका आणि रणवीर विमान तळावर पोहचले. दोघांनीही पांढरे कपडे परिधान केले होते. काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या घरी नंदी पूजा आणि रणवीर च्या घरी देखील लग्न सोहळ्याचे काही विधी पार पडले आहेत. त्यामुळे आता ही जोडी अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.
इटली मध्ये दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा १४ आणि १५ नोव्हेंबर या दिवशी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात नेमकेच पाहुणे हजेरी लावण्याची शक्यता आहे. काहीदिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीरने एकत्र संजय लीला भन्साळी यांच्या घरी जाऊन लग्नाचे आमंत्रण दिले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'राम -लीला','बाजीराव -मस्तानी आणि 'पद्मावत' या सुपरहीट सिनेमामध्ये दोघांनी काम केले आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणाला या सिनेमाच्या सेट्स वरूनच सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर या जोडीने लग्नाचा निर्णय घेतला आहे.