Daler Mehndi Sentenced Jail: लोकप्रिय गायक दलेर मेहंदीला 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; मानवी तस्करी प्रकरणात झाली अटक
Daler Mehendi! (Photo credits: Instagram)

प्रसिद्ध पंजाबी/बॉलिवूड गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी त्याला ठोठावलेला तुरुंगवास कायम ठेवला आहे. गायकावर अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. याआधी पटियालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. आता त्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

दलेर मेहंदीला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे क्रिकेटरमधून राजकारणी झालेले नवज्योतसिंग सिद्धू रोड रेज प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. 2003 मध्ये दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमसेर सिंग यांना मानवी तस्करीप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. दोघांविरुद्ध अमेरिकेत 31 गुन्हे दाखल आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांवर आरोप आहे की ते लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असत. (हेही वाचा: अभिनेत्री Rhea Chakraborty ने सुशांत सिंह राजपूतला अनेकवेळा दिला होता गांजा; NCB चा दावा)

आरोप आहे की, 1998 ते 1999 दरम्यान दलेर मेहंदीने सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू जर्सीमध्ये किमान 10 लोकांना बेकायदेशीरपणे सोडून दिले होते. या प्रकरणी न्यायालयाने 15 वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये गायकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. मात्र, दलेर मेहंदीच्या वकिलाने या निर्णयाला पटियाला न्यायालयात आव्हान दिले, त्यानंतर न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय कायम ठेवत गायक आणि त्याच्या भावाला तुरुंगात पाठवले.