बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सह मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि नात आराध्या बच्चन (Aradhya Bachchan) यांना कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर अमिताभ आणि अभिषेक यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले. अमिताभ यांच्या सह कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच प्रकृती सुधारण्यासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. दरम्यान अमिताभ-अभिषेक यांच्या प्रकृतीविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ-अभिषेक या दोघांच्याही प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. परंतु, ऐश्वर्या आणि आराध्या यांना अद्याप हॉस्पिटलमधून सुटी मिळणार नाही.
11 जुलै रोजी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दोघांनीही ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यानंतर बॉलिवूड कलाकारांसह चाहत्यांकडून दोघांनाही बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पूजा-प्रार्थना करण्यात आल्या. दरम्यान अमिताभ बच्चनही हॉस्पिटलमधून सोशल मीडियावर भलतेच अॅक्टीव्ह होते. सातत्याने ट्विट करत त्यांनी चाहत्यांशी संवाद सुरु ठेवला होता. तसंच कोविड-19 संकटात अविरतपणे काम करत असणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक आणि प्रार्थना करणारे चाहते यांचे त्यांनी ट्विटद्वारे आभार मानले होते. (अमिताभ बच्चन यांनी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या सोबतचा खास फोटो शेअर करत कोविड-19 संसर्गातून बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे मानले आभार, View Tweet)
ऐश्वर्या आणि आराध्या देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती 12 जुलै रोजी समोर आली. त्यानंतर त्या दोघींनाही होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण हलका ताप जाणवू लागल्याने त्या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने जया बच्चन सुखरुप असून घरातील इतर सर्व सदस्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.