भारतामध्ये कलम 377 (Section 377) रद्द केल्यानंतर आता कुठे LGBTQ लोकांना स्वीकारले जात आहे. याबाबत अजूनही उदासीन असलेल्या समाजामध्ये दोन गे मुलांचे नाते ही तर विचार करण्याच्या पलीकडील गोष्ट समजली तर वावगे ठरणार नाही. अशा समाजात लेखक-फिल्ममेकर अपूर्व असरानी (Apurva Asrani) आणि त्याचा पार्टनर सिद्धांत पिल्लई (Siddhant Pillai) यांचे नाते हे अनेकांसाठी रोल मॉडेल होते. गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्व व सिद्धांत सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या नात्यातील अनेक क्षण शेअर करत आले आहेत. मात्र आता तब्बल 14 वर्षांनी 43 वर्षीय अपूर्व व सिद्धांत यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
अपूर्वने सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणतो, ‘काळजावर दगड ठेऊन मी हे सांगू इच्छित आहे की, मी आणि सिद्धांत विभक्त झालो आहोत. मला माहित आहे की आम्हाला एलजीबीटीक्यू समुदायात रोल मॉडेल म्हणून पाहिले गेले होते, परंतु मला हेही सांगायचे आहे की या 14 वर्षांतील प्रत्येक दिवस महत्वाचा होता. म्हणूनच अगदी शांतपणे आम्ही वेगळे झालो.’
View this post on Instagram
अपूर्व पुढे म्हणतो, ‘समलैंगिक जोडप्यांसाठी भारतात कोणतेही संदर्भ किंवा रोल मॉडेल नाहीत ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली जाऊ शकते. आम्हाला वाटते की आम्ही आपला मार्ग निवडला आहे, परंतु आम्ही भारतामधील पहिली पिढी आहोत, ज्यांनी आपले प्रेम पूर्णतः व निर्भयपणे जगले. म्हणूनच दु:खी न होता मी हे लिहित आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की, आमची प्रायव्हसी आणि आमच्या भावनांचा आदर करा आणि कोणतेही अनुमान काढू नका. आम्हाला आपल्या मेसेजमध्ये टॅग करु नका, हा आमच्यासाठी खूप कठीण काळ आहे.’ (हेही वाचा: Kirron Kher Diagnosed With Multiple Myeloma: अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान; पती अनुपम खेर यांनी दिली माहिती)
अपूर्व पुढे लिहितो, ‘अजूनही आशा आहे... माझ्यासाठी सिडसाठी आणि अशा प्रत्येकासाठी ज्याला प्रेम हवे आहे, कमिटमेंट हवी आहे, एक सुरक्षित घर हवे आहे.’ अपूर्व आणि सिद्धांत हे गेले 14 वर्ष रिलेशनमध्ये आहेत. मुंबईमध्ये अनेक वर्ष ते एकमेकांचे कझिन म्हणून राहिले व गेल्या वर्षी दोघांनी गोव्यामध्ये स्वतःचे घर घेतले होते. दरम्यान, अपूर्व एक लोकप्रिय चित्रपट संपादक आणि स्क्रीन लेखक आहे. सत्या, शाहिद, सिटी लाइटस, अलीगढ़ सारख्या चित्रपटांचे पटकथा आणि संवाद लेखक म्हणून त्याला ओळखले जाते.