Bollywood Drug Probe: ड्रग प्रकरणात NCB कडून 'क्षितीज रवी प्रसाद'ला अटक; धर्मा प्रॉडक्शनशी जोडले गेले होते नाव
Dharma Productions’ Kshitij Ravi Prasad (Photo Credits: Instagram)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या केसमध्ये सध्या एनसीबी (NCB) कडून ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार अडकत चालले आहेत. आता धर्मा प्रॉडक्शनचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज रवि प्रसाद (Kshitij Ravi Prasad) ला शनिवारी चौकशीनंतर एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिज रवि प्रसाद याच्या घरावर छापा टाकला असता तिथे अंमली पदार्थ सापडले होते. क्षितिज रवी प्रसादला ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी शुक्रवारी त्याच्या निवासस्थावरून एनसीबीच्या कार्यालयात आणले गेले. क्षितीजची तब्बल 24 तासांपेक्षा जात वेळ चौकशी सुरु होती.

आता एनसीबी क्षितीजची मेडिकल टेस्ट करून रिपोर्ट कोर्टासमोर सादर करेल व रिमांड मागेल. क्षितीजने चौकशी दरम्यान ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. एनसीबी चौकशीत क्षितीजने काही मोठी नावे उघड केल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील हाय-प्रोफायल ड्रग पेडलर अंकुश अनरेजाच्या चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, क्षितीज प्रसाद यानेच बॉलिवूड सेलेब्जसोबत लिंक बनवण्यास मदत केली होती. अंकुश अनरेजा, अनुज केशवानी आणि करमजित सिंह यांच्यासारख्या ड्रग्ज पेडलर सोबतचे क्षितीजचे चॅट एनसीबीला सापडले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून क्षितीजचे धर्मा प्रॉडक्शनशी नाव जोडले जात होते. मात्र काल कंपनीचे प्रमुख करण जोहर याने स्पष्टीकरण दिले की, क्षितीज केवळ काही कालावधी करीता धर्माच्या सिस्टर-कंपनीशी संबंधित होता, ज्याचा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता. (हेही वाचा: NCB आता टीव्ही इंडस्ट्रीमध्येही करणार ड्रग्ज प्रकरणाची चौकशी; टीव्ही कपल Abigail Pande आणि Sanam Johar यांना एनसीबीने बजावला समन्स)

क्षितिजशिवाय एनसीबीने अंमली पदार्थांच्या चौकशीत 20 हून अधिक लोकांना अटक केली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. सुशांतचा हाऊसहेल्प, स्टाफ मॅनेजर आणि सुमारे 16 ड्रग पेडलरना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. रकुल प्रीत सिंहची चौकशी झाल्यांनतर आज दीपिका पदुकोण व श्रद्धा कपूर यांची चौकशी पार पडली.