
Bhagyashree Hospitalised: सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' या चित्रपटात तिच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्रीला रुग्णालयात दाखल (Bhagyashree Hospitalised) करण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या बेडवरचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली आहे. तथापि, तिच्या रुग्णालयात दाखल होण्यामागील कारण देखील उघड झाले आहे. अभिनेत्री भाग्यश्रीला पिकलबॉल खेळताना कपाळावर खोल जखम झाली. त्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे.
शस्त्रक्रियेनंतर भाग्यश्रीला 13 टाके -
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये भाग्यश्री हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर तिच्या कपाळावर 13 टाके घालण्यात आले. पापाराझी विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर रुग्णालयातील अभिनेत्रीचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात भाग्यश्रीच्या कपाळावर मोठी जखम दिसत आहे. (हेही वाचा - मराठमोळी भाग्यश्री मोटे झळगणार टॉलिवूडमध्ये)
View this post on Instagram
यातील एका फोटोमध्ये, भाग्यश्री रुग्णालयाच्या बेडवर पडलेली दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये, तिच्या कपाळावर पट्टी असून दुखापत असूनही ती हसताना दिसत आहे. दरम्यान, भाग्यश्रीची प्रकृती पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली, 'अरे देवा... भाग्यश्री जी लवकर बऱ्या व्हा.' दुसऱ्याने एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तुम्हाला खरचं खूप लागलं आहे. लवकर बरे व्हा.'
सलमानसोबत 'मैने प्यार किया' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर भाग्यश्री प्रसिद्धीच्या झोतात आली. हा त्या काळातील एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटातून भाग्यश्री खूपचं लोकप्रिय झाली. तथापि, लग्नानंतर तिने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या काही वर्षांत ती काही निवडक चित्रपटांमध्ये दिसली आहे. भाग्यश्रीने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर मराठी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.