Blackbuck Poaching Case: जोधपुर कोर्टाकडून सलमान खानला दिलासा; फेटाळून लावल्या राज्य सरकारच्या याचिका
Salman Khan (Photo Credits: Instagram)

सलमान खानकडून (Salman Khan) शस्त्रे हरवल्याबाबत दिलेल्या खोटा प्रतिज्ञापत्र प्रकरणात कोर्टाने गुरुवारी निर्णय दिला आहे. राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका कोर्टाने आपल्या निकालामध्ये फेटाळल्या आहेत. शस्त्रास्त्र कायद्याच्या बाबतीत राज्य सरकारने शस्त्रास्त्र परवान्याबाबत खोटे प्रतिज्ञापत्र देण्याविरोधात अपील दाखल केले होते. याबाबत कोर्टाने सलमानला दोषी ठरवले असते तर त्याच्यावर आयपीसी कलम 193  नुसार गुन्हा दाखल झाला असता, ज्यामध्ये जास्तीत जास्त 7 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावला जाऊ शकला असता.

काळवीट शिकार प्रकरण आणि शस्त्रास्त्र कायदा प्रकरणात कोर्टाने सलमानला त्याच्या शस्त्रास्त्रांची मूळ प्रत विचारली होती, ज्यावर सलमान खानने असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी खानने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते आणि म्हटले होते की त्याचा परवाना कुठेतरी हरवला आहे. त्यानंतर सलमानने परवाना हरवल्याबद्दल मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात केलेल्या एफआयआरची प्रत सादर केली होती. (हेही वाचा: Sapna Choudhary, प्रसिद्ध हरियाणवी गायिका, डान्सर विरूद्ध आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल; दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू)

सलमान खानने एफआयआरची प्रत न्यायालयात सादर केल्यानंतर मुंबई पोलिसांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी मुंबई पोलिस कर्मचाऱ्याने कोर्टाला सांगितले की, सलमानचा शस्त्र परवाना मुंबई पोलिस आयुक्तालयात नूतनीकरणासाठी विचाराधीन आहे. सलमानचा परवाना हरवला नसून त्याचे नुतनीकरण होत असल्याचे उघड होताच, सरकारी वकिलांनी कोर्टासमोर अर्ज सादर केला आणि सलमानवर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आणि खोटा पुरावा सादर केल्याचा आरोप केला. सरकारी वकील भवानीसिंग भाटी यांनी सलमान खानवर आयपीसीच्या कलम 193 अन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती.

आता सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत म्हणाले, 'जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्य सरकारच्या वतीने दाखल केलेल्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. आम्ही 2006 मध्ये उत्तर दिले होते. की चुकीचे प्रतिज्ञापत्र दाखल झाले नाही. अशा याचिका या सलमानची प्रतिमा डागाळन्यासाठी दाखल केल्या जाता आहेत.’