Satyajit Ray (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील महान फिल्ममेकरपैकी एक असलेले सत्यजित रे (Satyajit Ray) यांचा 'पाथेर पांचाली' (Pather Panchali) हा चित्रपट, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESSI) ने आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट (Best Indian Film) म्हणून घोषित केला आहे. 1955 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांच्या स्पर्धे’त आघाडीवर होता. त्याने टॉप 10 च्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ‘पाथेर पांचाली’ हा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक सत्यजित रे यांचा दिग्दर्शकीय पदार्पण होता

हा चित्रपट विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या 1929 च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल सांगायचे तर, पाथेर पांचालीमध्ये सुबीर बॅनर्जी, कानू बॅनर्जी, करुणा बॅनर्जी, उमा दासगुप्ता, पिनाकी सेनगुप्ता आणि चुनिबाला देवी यांनी भूमिका केल्या होत्या. पाथेर पांचालीनंतर, या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या चित्रपटांमध्ये ऋत्विक घटक यांचा 1960 सालचा मेघे ढाका तारा (बंगाली), मृणाल सेन यांचा 1969 चा ‘भुवन शोम’ (हिंदी) यांचा समावेश आहे.

यादीत चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी अनुक्रमे, अदूर गोपालकृष्णन यांचा 1981 सालचा मल्याळम चित्रपट एलिप्पथायम, 1977 मध्ये आलेला गिरीश कासारवल्ली यांचा घटश्राद्ध चित्रपट आणि 1973 मध्ये प्रदर्शित झालेला एम.एस. सथ्यू यांचा गरम हवा हा चित्रपट यांचा नंबर लागतो.

त्यानंतर सत्यजित रे यांचा 1964 सालचा चित्रपट चारुलता सातव्या क्रमांकावर, श्याम बेनेगल यांचा 1974 चा अंकुर आठव्या, 1954 चा गुरु दत्त यांचा चित्रपट प्यासा नवव्या तर रमेश सिप्पी दिग्दर्शित 1975 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी ब्लॉकबस्टर शोले हा दहाव्या स्थानावर आहे. अशाप्रकारे यामध्ये पाच हिंदी चित्रपट, तीन बंगाली चित्रपट आणि मल्याळम आणि कन्नड भाषेतील प्रत्येकी एक चित्रपट आहे. (हेही वाचा: तब्बल 18 वर्षानंतर उलगडले रहस्य; जाणून घ्या कॉफी विथ करणच्या हॅम्परमध्ये नक्की काय असते)

दरम्यान, FIPRESCI ची स्थापना 1930 मध्ये झाली. हे व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, कान्स चित्रपट महोत्सव, व्हेनिस चित्रपट महोत्सव, वॉरसॉ चित्रपट महोत्सव आणि इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार प्रदान करते.