बॉलिवूडचा प्रसिद्ध दिगदर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याला सोशल मीडियावरील वादग्रस्त विधानांमुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंग स्वरूपातील रोषाला सामोरे जावे लागायचे.कित्येकदा तर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात होत्या. पण आता हा प्रकार वाढत जाऊन थेट अनुरागच्या कुटुंबियांना त्रास होत असल्याने त्याने स्वतःच आपले ट्विटर (Twitter) अकाउंट डिलीट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आपल्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन,मेसेज येत असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले, तसेच सत्ताकारी आपला आवाज दाबू पाहत आहे असा आरोप लगावत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.
अनुराग कश्यप याने आपल्या अकाउंट डिलिट करण्याआधी ट्विट करत, “ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येऊ लागतात आणि तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. चोरटे गुंड देशावर राज्य करतील आणि हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा”, असं म्हटलं आहे. तर त्यानंतर लगेचच त्याने दुसऱ्या ट्विट मध्ये “तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावं ही इच्छा. हे माझं अखेरचं ट्विट आहे. कारण मी माझं ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलतच नाही. गुड बाय”.असे म्हणत ट्विटरला रामराम ठोकला आहे.
अनुराग कश्यप ट्विट
हे ही वाचा -'Gangs Of Wasseypur' नावाची साडेसाती आयुष्यातून निघून जावी- अनुराग कश्यप
दरम्यान, मागील काही दिवसात, अनेकदा अनुराग हा वादग्रस्त विधाननवरून चर्चेत आला होता. देशात वाढत्या मॉब लिंचिंगच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत विविध क्षेत्रातील जवळजवळ 49 मंडळींनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीना पत्र लिहिले होते तेव्हा सुद्धा अनुराग याला सहभागासाठी जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. तर काश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर त्याने सरकारच्या निर्णय प्रकियेवर सवाल करताच नेटकरी पुन्हा एकदा संतापून बेताल बोलू लागले होते. याआधी अनुरागच्या मुलीला सुद्धा अशाच प्रकारे बलात्काराच्या धमक्या मिळत होत्या, ज्यावर अनुरागने पुन्हा मोदी सरकारला धारेवर धरले होते.