आमिर खान-किरण राव यांच्या 'पानी फाऊंडेशन'ला Andrew Millison यांच्याकडून दाद; Water Cup Competition हे पृथ्वीवरील सर्वोत्तम मोठं Permaculture Project म्हणत कौतुक
आमिर खान, किरण राव (Photo Credits: Youtube)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाऊंडेशन'ची आणि त्यांच्या मेहनतीची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. Andrew Millison या इंटरनॅशनल परमाकल्चरल डिझायनर आणि प्रोफेसरने त्यांचं कौतुक केले आहे. नुकताच त्यांनी आमिरच्या पानी फाऊंडेशनच्या कार्याचं कौतुक करणारा एपिसोड त्यांच्या युट्युब चॅनलवर प्रसारित केला आहे. अ‍ॅन्ड्र्यु काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. येथे त्यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली. तसेच वॉटर कप कॉम्पिटिशन (Water Cup Competition)चं देखील कौतुक केले आहे. हा उपक्रम गावकर्‍यांसाठी पानी फाऊंडेशन कडून दरवर्षी घेतला जातो. तसेच हा पृथ्वीवर उत्तम Permaculture Project असल्याचं म्हटलं आहे. त्याची शॉर्ट फिल्म देखील बनवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पानी फाऊंडेशन गावकर्‍यांच्या सहभागाने काम करते. पानी फाऊंडेशनची सुरूवात आमिर खान, किरण राव, रीना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनी केली आहे. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत या संकल्पनेमधून ही संघटना उभी राहिली. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहताना आता तो दुष्काळ टाळण्यासाठी लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी मदत करणे , हे पानी फाउंडेशनचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्रातील गावा गावांमध्ये श्रमदानाद्वारे जलसंधारणासाठी आवश्यक पाणलोट रचना उभारल्या जातात, मशीनकामाच्या वापरासाठी पैसे उभे केले जातात, माती परीक्षण आणि माती उपचार केले जातात त्यामधून पाण्याचा साठा वाढवण्यसाठी पाणी फाऊंडेशन ग्रामस्थांना मदत करतात, प्रोत्साहित करतात.