Pulwama Terror Attack: अमिताभ बच्चन यांच्याकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
Amitabh Bachchan | (Photo Credits: Twitter)

Pulwama Terror Attack: पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना बॉलीवुड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रत्येकी पाचल लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. संपूर्ण देशभरातील जनभावना शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे. या कुटुंबीयांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारनेही मदत दिली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनीही या जवानांच्या कुटुंबियांना अर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीबद्दल अमिताभ बच्चन यांच्याविषयी कौतुकाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले.

या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. बॉलिवुडमधीलही अनेक कलाकारांनी आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. (हेही वाचा, 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंह सिद्धू यांची उचलबांगडी; दहशतवादी हल्ल्यावर वक्यव्य देणे पडले महागात)

दरम्यान, बच्चन यांच्या प्रवक्त्याने बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या मदतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, ही मदत त्या कुटुंबीयांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.