Amitabh Bachchan (Photo Credits: Amitabh Bachchan Blog)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी लॉकडाऊन (Lockdown) काळात निर्माण झालेला स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी मदतीची हात पुढे केला आहे. अलिकडेच त्यांनी मुंबईत (Mumbai) अडकलेल्या 200 हून अधिक स्थलांतरीत मजूरांना उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी पाठण्यासाठी बसेसची सोय केली होती. त्यानंतर आता 500 हून अधिक मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी फ्लाईट्सची सोय उपलब्ध करुन दिली आहे.

मिड डे च्या रिपोर्टनुसार, बिग बी (Big B) यांनी स्थलांतरीत मजूरांना वाराणसी येथे पाठवण्यासाठी 3 चार्टर फ्लाईट्स बुक केले आहेत. या सर्व कामाची पाहाणी बिग बी यांच्या कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर राजेश यादव करत आहेत. विशेष म्हणजे आपल्या या मदतकार्याची कोठेही चर्चा किंवा प्रचार होऊ नये, अशी बिग बी यांची इच्छा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजूरांवर ओढावलेली परिस्थिती पाहून अमिताभ बच्चन अतिशय दुःखी झाले होते आणि या कठीण काळात ते मदत मजुरांची मदत करु इच्छित होते. (सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या वतीने मजुरांना मूळगावी नेणाऱ्या 10 बस हाजी अली येथून उत्तर प्रदेश साठी रवाना, See Photos)

या इच्छेतूनच त्यांनी वाराणसीसाठी इंडिगो एअरलाईन्सची फ्लाईट बुक केली होती. आज सकाळी ती वाराणसीसाठी रवाना झाली. यात विमानातून एकूण 180 प्रवासी स्वगृही परतणार होते. यासाठी सकाळी 6 वाजता त्यांना विमानतळावर दाखल होण्यास सांगितले होते. दरम्यान या मजुरांना ट्रेनने घरी पाठवण्याचा मानस होता. मात्र ट्रेनची सोय न झाल्याने विमानाचा पर्याय निवडण्यात आला. इतर दोन विमाने देखील आज वाराणसीसाठी रवाना होतील. याशिवाय यापुढे पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू आणि इतर राज्यात मुजरांना पाठवण्यासाठी ट्रेन्सच्या तिकीटाचा सर्व खर्च अमिताभ बच्चन करणार आहेत.