Amitabh Bachchan shared Old photo (PC - Twitter)

बॉलिवूड शेहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'अमर अकबर अँथोनी' (Amar Akbar Anthony) या सुपरहिट चित्रपटाला आज 43 वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे औचित्य साधून बिग बींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाचा एक जुना फोटो (Old Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई, अभिनेत्री परवीन बाबी, शबाना आझमी, नीतू सिंग, अभिनेते विनोद खन्ना आणि धर्मेंद्र दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना अमिताभ यांनी 'अमर अकबर अँथोनी' चित्रपट मुंबईतील 25 चित्रपटगृहात 25 आठवडे चालला, असं म्हटलं आहे. तसेच धर्मेंद्र यांनी या चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप दिला होता, असंही बिग बी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'अमर अकबर अँथोनी' हा चित्रपट प्रेक्षक आजही पुन्हा-पुन्हा पाहतात. या चित्रपटात अमरची भूमिका विनोद खन्ना, ऋषी कपूर यांनी अकबरची तर अमिताभ बच्चन यांनी अँथोनीची भूमिका साकारली होती. त्यावेळी अमरच्या रोलसाठी धर्मेंद्र यांना ऑफर देण्यात आली होती. मात्र, धर्मेंद्र हे मनमोहन देसाई यांच्यासोबत 'चाचा भतीजा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपट साईन केले होते. म्हणून त्यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यामुळे मनमोहन देसाई यांनी अमरच्या भूमिकेसाठी विनोद खन्ना यांना कास्ट केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी टक्कल असणाऱ्या व्यक्तींसाठी शेअर केल 'हे' भावनिक गाण; पहा व्हिडिओ)

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ यांना पहिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. अभिताभ यांचा मनमोहन देसाईं यांच्यासोबतचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर अभिताभ आणि मनमोहन देसाई यांनी 'परवरिश', 'सुहाग', 'नसीब', 'देशप्रेमी', 'कुली' आणि 'गंगा जमुना सरस्वती' आदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.