अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीज डेट (Release Date) वरुन गेल्या काही काळापासून प्रचंड गोंधळ उडाला आहे. दरम्यान, हा सिनेमा मागील वर्षी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. मात्र कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2 एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचे समोर आले. परंतु, आता हा सिनेमा 30 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स एंटरटेनमेंट ला सिनेमा रिलीज करण्याची इच्छा आहे. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक निर्बंध घातले जात आहेत. अशा परिस्थितीत सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे सूर्यवंशी सिनेमाच्या रिलीज डेट बद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दरम्यान, वंडर वीमेन आणि मास्टर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात धाव घेतली. त्यामुळे सूर्यवंशी सिनेमा पाहण्यासाठी देखील प्रेक्षक सिनेमागृहात येतील, अशी निर्मात्यांना आशा आहे. त्यामुळे रोहित शेट्टीच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे 30 एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. (पहा सिनेमाचा ट्रेलर)
निर्माते आणि सिनेमा मालक यांच्यात कमाईवरुन वाद सुरु आहेत. मात्र कोणालाच नुकसान होऊ नये म्हणून सामंजस्याने या वादावर तोडगा काढण्याचा दोन्ही पक्षाचा प्रयत्न आहे. दरम्यान, सूर्यवंशी सिनेमात अक्षय कुमार सोबत कैटरिना कैफ झळकणार असून अजय देवगन आणि रणवीर सिंह पाहुणे कलाकार म्हणून वर्णी लावणार आहेत.