काय सांगता? अक्षय कुमारने वाढवली फी; नवीन चित्रपटासाठी घेतले तब्बल 120 कोटी, बनला देशातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता
File Picture of Indian actor Akshay Kumar (Photo Credits: IANS)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच आपल्या कमाईमुळे चर्चेत असतो. 2019 मध्येही अक्षय कुमारचे नाव सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींमध्ये प्रथम स्थानावर होते. जगातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्येही त्याचे नाव घेतले जाते. आता सातत्याने हिट फिल्म्स देत असलेल्या अक्षय कुमारने, आपल्या पुढच्या चित्रपटासाठी 120 कोटी रुपयांची डील केली असल्याची बातमी समोर येत आहे.

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने आगामी चित्रपटासाठी (आनंद एल राय दिग्दर्शित) 120 कोटी रुपयांचा करार केला आहे. याआधी प्रभासने साहोसाठी 100 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती.

आजकाल अक्षय कुमार सातत्याने हिट चित्रपट देत आहे. बॉक्स ऑफिसवरही त्याचे चित्रपट उत्तम कामगिरी करत आहेत. फक्त अक्षय कुमारच्या नावामुळे लोक चित्रपट पाहायला येत आहेत. त्याचा परिणाम डिजिटल नेटवर्कवरही पडला आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमारची फी देखील सातत्याने वाढत आहे. आता या 120 कोटींच्या करारामुळे अक्षय कुमार बॉलीवूडचा सर्वात महाग अभिनेता बनला आहे मात्र, अद्याप चित्रपटाचे नाव समोर आले नाही. या चित्रपटात अक्षयसोबत सारा अली खान आणि धनुषदेखील दिसू शकतात असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' आणि अजय देवगणचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर', या चित्रपटांनी 200 कोटींची कमाई केली आहे. 'गुड न्यूज' 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, तर 'तान्हाजी' यावर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. करण जोहरने अक्षयच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. 'गुड न्यूज'ने पहिल्या आठवड्यात 128 कोटींची कमाई केली होती. अक्षयच्या या नवीन चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल आणि येत्या 1-2 आठवड्यात चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल. (हेही वाचा: अक्षय कुमारने रचला इतिहास; एका वर्षात कमावले तब्बल 700 कोटी, असा भारतातील एकमेव अभिनेता)

गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्येही अक्षयचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात 'हाऊसफुल 4', 'मिशन मंगल', 'केसरी' आणि 'गुड न्यूज' समाविष्ट आहे.. दुसरीकडे 2020 मध्येही अक्षयचे चार चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्यामध्ये 'बच्चन पांडे', 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'पृथ्वीराज चौहान' बायोपिकचा समावेश आहे.