Aishwarya Rai Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने 1 नोव्हेंबर ला आपला 47 वा वाढदिवस (Birthday) साजरा केला. ऐश्वर्याला या खास दिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. चाहत्यांचं प्रेम पाहून ऐश्वर्यादेखील भावूक झाली. ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला वाढदिवस खास बनवणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ऐश्वर्याने आपली मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिच्यासोबतचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसेच तिच्या कुटुंबियांचे आणि हितचिंतकांचे आभार मानत ऐश्वर्याने म्हटलं आहे की, 'माझ्या जीवनातील प्रेम, आराध्या माझ्या परी, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझे धन्यवाद. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाचं असूद्या.'
ऐश्वर्याच्या वाढदिवसा निमित्त पती अभिषेक बच्चननेही सोशल मीडियावर तिच्याबरोबर एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना अभिषेकने लिहिलं होतं की, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको. प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद! तु आमच्यासाठी जे काही करते, त्याबद्दल धन्यवाद! हे खूप महत्वाचे आहे. तु नेहमी अशीच हसत आणि आनंदी रहा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो." (हेही वाचा - Coronavirus: अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह इतर 45 जणांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार; कोरोना काळात दिला होता मदतीचा हात)
अभिषेकने शेअर केलेल्या या फोटोवर हृतिक रोशन, रितेश देशमुख, बॉबी देओल, अरमान जैन यांच्यासह अनेक नामांकित सिलेब्रिटींनी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्या राय बच्चन रविवारी 47 वर्षांची झाली आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी ऐश्वर्या राय बच्चन चा जन्म झाला होता. ऐश्वर्या राय बच्चन 47 वर्षांची असली तरी आजही तिच्या सौंदर्यासमोर सर्व अभिनेत्र्या फिक्या आहेत. 1994 मध्ये मिस वर्ल्डचे विजेतेपद पटकावलेल्या ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं आहे.
ऐश्वर्याने प्रथम मणिरत्नमच्या तमिळ चित्रपट 'इरुवर' मध्ये काम केले होतं. त्यानंतर तिने बॉबी देओल सोबत 'और प्यार हो गया' या चित्रपटात काम केलं. परंतु, ऐश्वर्या रायला 'हम दिल दे चुके हैं सनम' या चित्रपटात मोठं यश मिळालं. संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटासाठी ऐश्वर्याला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.