अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ज्याप्रकारे तिच्या वादग्रस्त कमेंट्समुळे चर्चेत असते तशीच ती तिच्या विविधांगी भूमिकांमुळेही असते. या अभिनेत्रीने आपले चित्रपट आणि आपल्या अनोख्या शैलीने लोकांची मने जिंकली आहेत. 2019 मध्ये कंगना रनौत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली. आता ती काश्मीरची राणी दिद्दाच्या भूमिकेतही दिसणार आहे. त्याचबरोबर कंगना रनौतने नुकतेच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Prime Minister Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे.
कंगना रनौतने आपल्या ट्विटर हँडलवरून ही गोष्ट जाहीर केली आहे. कंगना रनौतने सांगितले आहे की, हा चित्रपट तिचे प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स निर्मित करेल. कंगना रनौतने एका फॅन पेजचे ट्विट रिट्विट करत लिहिले आहे की, 'माझ्या करिअरच्या सुरुवातीला एका आयकॉनिक महिलेबद्दल केलेले हे फोटोशूट आहे. त्यावेळी मला माहित नव्हते की एक दिवस मला त्यांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळेल.' कंगना रनौतने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसली आहे. कंगनाच्या या इंदिरा गांधी यांच्यावरील चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नाही.
This is a photoshoot about iconic women I did in the beginning of my career, little did I know one day I will get to play the iconic leader on screen. https://t.co/ankkaNevH2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 29, 2021
हा चित्रपट 'थलाईवी' सारखा बायोपिक असणार नाही, तर एक पिरीयड चित्रपट असेल जो आजच्या पिढीला देशातील सद्य सामाजिक-राजकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल. यामध्ये कंगना रनौत व्यतिरिक्त इतर अनेक आघाडीचे कलाकार दिसणार आहेत. (हेही वाचा: MayDay सिनेमाच्या सेटवरुन अमिताभ बच्चन यांनी शेअर केला फोटो; पहा बिग बींचा हटके अंदाज)
दरम्यान, यावर्षी कंगनाचा पुढचा चित्रपट 'थलाइवी' रिलीज होईल ज्यामध्ये ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती 'तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेची लढाऊ पायलट आणि 'धाकड'मध्ये एक गुप्त सेवा एजंट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त तिने नुकताच मणिकर्णिकाचा सिक्वल 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' बनवण्याचीही घोषणा केली आहे.