अभिनयानंतर Kangana Ranaut ने ठेवले Food Business मध्ये पाऊल; मनाली येथे लवकरच सुरु करणार Cafe and Restaurant
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या क्षेत्रात व्यवस्थित जम बसवल्यावर आता अभिनेत्री कंगना रनौत  (Kangana Ranaut) आपले अजून एक स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आता कंगना फूड बिझनेसमध्ये पाय ठेवत आहे. कंगना मनालीमध्ये आपले रेस्टॉरंट उघडणार आहे. हिमाचलमध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये ती आपला कॅफे आणि रेस्टॉरंटचा (Cafe and Restaurant) बिझनेस सुरु करत आहे. कंगनाने आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनालीमध्ये जमीनही खरेदी केली आहे. खुद्द कंगना रनौतने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.

कंगनाने ट्वीट केले आहे की, 'माझे हे नवे व्हेंचर, माझे स्वप्न आपणा सर्वांसोबत शेअर करीत आहे, जे आम्हाला जवळ आणेल. चित्रपटांव्यतिरिक्त, माझी दुसरी आवड ही 'फूड' आहे आणि आता मी अन्न आणि पेय उद्योगात प्रवेश करणार आहे. मनालीमध्ये माझा पहिला कॅफे आणि रेस्टॉरंट सुरु करत आहे. याबाबत माझ्या टीमचे आभार.' या ट्वीटसोबत कंगनाने लोकेशनवरील काही फोटोज शेअर केले आहेत.

फोटोंमधील लोकेशनवर कंगना तिच्या टीमसोबत आपल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल बोलताना आणि योजना आखताना दिसत आहे. फोटोंमध्ये तिची बहीण रंगोलीसुद्धा दिसत आहे. मागे मनालीचे मनोहर दृश्य नजरेस पडत आहे. (हेही वाचा: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम 'नवे लक्ष्य' या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात करणार पदार्पण)

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये आपल्या धाकड या आगामी चित्रपटाच्या शूटिंग संपवून कंगना नुकतेच मनाली येथे आपल्या घरी पोहोचली आहे. रजनीश घई दिग्दर्शित ‘धाकड’ यावर्षी 1 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यावर्षी कंगनाचा पुढचा चित्रपट 'थलाइवी' रिलीज होईल ज्यामध्ये ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती 'तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेची लढाऊ पायलट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त तिने नुकताच मणिकर्णिकाचा सिक्वल 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' बनवण्याचीही घोषणा केली आहे.