ADIPURUSH POSTER

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाला सध्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या चित्रपटातील अनेक प्रसंग, पात्रे, कपडे, संवाद अशा अनेक गोष्टींवर टीका केली जात आहे. हनुमानजी यांचे 'जलेगी तेरी बाप की' सारखे संवाद लोकांच्या भावना दुखावणारे असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या संवादांवरून वाद निर्माण झाल्यानंतर आता निर्मात्यांनी त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटातील हनुमानजींच्या डायलॉग्सवरून सोशल मीडियावर मेकर्सना खूप ट्रोल केले जात आहे. त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला याने सोशल मीडियावर सांगितले की, चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकाने ठरवले आहे की, प्रेक्षकांना दुखावणारे संवाद सुधारले जातील. लंकेश, राघव आणि जानकीच्या आकर्षक लूकमुळे आधीच दिग्दर्शक ओम राऊत ट्रोल झाला होता. आता त्याचा संवाद लेखक मनोज मुंतशीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा चित्रपटातील संवादावर टीका होऊ लागली तेव्हा मनोजने त्याच्या लेखनाबाबत बाळबोध युक्तिवाद करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांचा राग शांत झाला नाही. आता लोकांच्या भावना लक्षात घेऊन आपण संवाद बदलायला तयार असल्याचे मनोज सांगतो. त्याने स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नवीन संवाद याच आठवड्यात चित्रपटात समाविष्ट केले जातील. (हेही वाचा: उत्तर प्रदेशमध्ये आदिपुरुष चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; राष्ट्रीय लोक दलाने सीएम योगींना लिहिलं पत्र)

महत्वाचे म्हणजे आदिपुरुष प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर आगाऊ बुकिंग झाले होते. यामुळे या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईबाबत 100 कोटीचा आकडा पार केला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, निर्मिती कंपनी टी-सीरीजने सांगितले की, आदिपुरुष हा हिंदीत बनलेल्या कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत देशात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.