Actor Vishal Anand Dies: 'चलते चलते' फेम जेष्ठ अभिनेते विशाल आनंद यांचे दीर्घ आजाराने निधन
Vishal Anand (Photo Credits: File Image)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विशाल आनंद (Vishal Anand) यांचे दीर्घ आजाराने (Prolonged Illness) 4 ऑक्टोबर रोजी निधन झाले. विशाल आनंद हे त्यांच्या 'चलते चलते' (Chalte Chalte) चित्रपटातील भूमिकेसाठी लोकप्रिय होते. विशाल आनंद भीष्म कोहली म्हणूनही ओळखले जात असत. विशाल आनंद हे अभिनेता देव आनंद यांचे पुतणे होते व त्यांनी एकूण 11 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. विशाल आनंद यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीत विशाल आनंद यांनी अशोक कुमार, सिमी ग्रेवाल आणि मेहमूद अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केले.

त्यांच्या करियरमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘चलते चलते’कडे पाहिले जाते. या चित्रपटाचे शीर्षक गीत, ‘चलते-चलते मेरे यह गीत याद रखना’ खूप लोकप्रिय झाले होते. आजही अनेक ठिकाणी हे ऐकायला मिळते. विशाल आनंद यांनी या चित्रपटाद्वारे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांना बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक दिला होता. त्याआधी बप्पी यांनी केलेल्या 5 चित्रपटांना विशेष सफलता मिळाली नव्हती. या गाण्यामुळे प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्या करिअरने फारच मोठी उंची गाठली. या चित्रपटामध्ये विशाल आनंदबरोबर सिमी गरेवाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

विशाल आनंद यांचे खरे नाव भीष्म कोहली असे होते. विशाल हे देव आनंद यांचा पुतण्या व अभिनेता पूरब कोहली हा विशाल आनंद यांचा पुतण्या आहे. विशाल आनंद यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये हमारा अधिकार (1970), सा-रे-गा-मा-पा (1972), टॅक्सी ड्रायव्हर (1973), हिंदुस्तान की कसम (1973), चलते चलते (1976), किस्मत (1980) यांचा समावेश आहे. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत याची हत्या नसून आत्महत्याच; AIIMS चा अंतिम अहवाल CBI कडे सुपूर्त)

दरम्यान, सन 2020 मध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान, सुशांतसिंह राजपूत, सरोज खान, जगदीप सारख्या सेलिब्रिटींचे यावर्षी निधन झाले. आता 4 ऑक्टोबर रोजी विशाल आनंद यांनी अखेरचा श्वास घेतला.