बॉलिवूड अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चेत असतो. आता त्याने पुन्हा एकदा असे काहीतरी म्हटले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. इतकेच नाहीतर एजाज खान याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याविरूद्ध खार पोलिस स्टेशनमध्ये बदनामी, द्वेषयुक्त भाषण आणि निषेधाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी, रात्री उशिरा एजाज फेसबुकवर लाईव्ह आला होता, त्यावेळी तो मुस्लिमांशी संबंधित अनेक गंभीर मुद्द्यांवर बोलला. यावेळी त्याने अनेक आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.
एएनआय ट्वीट-
Mumbai: Actor Ajaz Khan has been arrested & case registered against him at Khar Police Station on charges of defamation, hate speech & violation of prohibitory orders. pic.twitter.com/1glDd9y4Q0
— ANI (@ANI) April 18, 2020
एजाज आपल्या लाइव्हमध्ये म्हणाला होता की, मुंगी मरण पावली, मुस्लिम जबाबदार... हत्ती मरण पावला, मुस्लिम जबाबदार... दिल्ली मध्ये भूकंप झाला, यासाठी सर्व मुसलमान जमिनीखाली शिरले व त्यांनी भूकंप आणला.. म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी मुस्लिम जबाबदार आहे. पण यामागे नक्की कोण षडयंत्र रचत आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे?’
व्हिडिओमध्ये एजाजने या सर्व गोष्टींसाठी राजकीय पक्षांना दोषी ठरवले आहे. कोरोना विषाणूकडून जातीय मुद्यांवर लोकांचे लक्ष वेधण्याचा हा कट आहे, असेही त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. व्हिडिओच्या शेवटी तो म्हणाला की, 'देशात असे करणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसची लागण होवो.’ एजाजच्या अशा वक्तव्यानंतर त्याच्यावर अनेकांनी तोंडसुख घेतले होते व त्याच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती. (हेही वाचा: बहिण रंगोली चंदेलच्या ट्विट प्रकरणावर भडकली कंगना रनौत; 'अशा प्लॅटफॉर्मला हाकलून भारताने सुरु केले पाहिजे स्वतःचे सोशल मिडिया व्यासपीठ')
आता मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात एजाज खानविरोधात आयपीसी कलम 153A, 117, 121 153 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याला आज रात्री न्यायालयात हजर केले जाऊ शकते.