Abhishek Bachchan Buys Six Apartments In Borivali: अभिषेक बच्चनने बोरीवलीमध्ये खरेदी केले तब्बल सहा लक्झरी अपार्टमेंट्स- Reports
Abhishek Bachchan

Abhishek Bachchan Buys Six Apartments In Borivali: नुकतेच मुंबई हे राहण्यासाठी देशातील सर्वात महागडे शहर ठरल्याची बातमी आली होती. आता माहिती मिळत आहे की, अभिनेता अभिषेक बच्चनने मुंबईच्या बोरीवली परिसरात 6 घरे विकत घेतली आहे. अभिषेकने इथल्या ओबेरॉय रियल्टीच्या प्रतिष्ठित ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात सहा अपार्टमेंट्स विकत घेतले आहेत. Zapkey.com ने मिळवलेल्या मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, या खरेदीवर बॉलीवूड अभिनेत्याने तब्बल 15.42 कोटी रुपये खर्च केले आहेत.

अहवालानुसार, एकूण 4,894 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अपार्टमेंट्स, बोरीवली पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत असलेल्या हाय-राईजच्या 57 व्या मजल्यावर आहेत. 28 मे 2024 रोजी अंतिम झालेल्या व्यवहारात दहा कार पार्किंगच्या जागांचाहीचा समावेश आहे.

अभिषेक बच्चनसाठी रिअल इस्टेटमधील ही पहिली गुंतवणूक नाही. अभिषेकने यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये ओबेरॉय 360 वेस्ट प्रकल्पातील अपार्टमेंट 45.75 कोटींना विकले होते. अभिषेकचे वडील, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील मालमत्ता गुंतवणुकीत सक्रिय आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, त्यांनी अलिबागमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आणि अयोध्येत 14.5 कोटी रुपयांना आणखी एक जागा विकत घेतल्याची माहिती आहे. या संपादनांमुळे बच्चन कुटुंबाच्या विविध मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये भर पडली आहे, त्यात त्यांचा जुहू येथील बंगला प्रतीक्षाचाही समावेश आहे. (हेही वाचा: Bigg Boss OTT 3: 'वडा पाव गर्ल' चंद्रिका दीक्षित बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनची स्पर्धक; अनिल कपूर करणार शो होस्ट)

दरम्यान, ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पाने इतर उल्लेखनीय व्यक्तींनाही आकर्षित केले आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांचेही याच इमारतीत एक अपार्टमेंट आहे, तर डी’मार्टचे मालक राधाकिशन दमाणी आणि सहयोगींनी फेब्रुवारी 2023 मध्ये येथे अनेक अपार्टमेंटमध्ये 1,238 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.