आमिर खान कोकणात दाखल; सिंधुदुर्गातील भोगावे बीचवर कुटुंबियांसह करणार न्यू ईअर सेलिब्रेशन
Aamir Khan (Image Credit: Stock Images)

बॉलिवूड सेलिब्रिटींचे न्यू ईअर सेलिब्रेशन दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. सेलिब्रिटींचे हटके प्लॅन्स, परदेश दौरे यांची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा असते. दरम्यान, कोरोना संकटामुळे दरवर्षी न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) परदेशी जाणारे सेलिब्रेटी यंदा देशातच नववर्षाचा आनंद साजरा करणार आहेत, असे दिसून येत आहे.  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या न्यू इअर सेलिब्रेशनसाठी कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) भोगावे  बीचवर (Bhogave Beach) तो कुटुंबियांसोबत मुक्काम करणार आहे.

दरम्यान, या संदर्भातील कोणतीही माहिती आमिर खान याने जाहीर केलेली नाही. मात्र सोबत पत्नी किरण राव आणि मुलं देखील आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टसाठीच आमिर कोकणात गेल्याचे बोलले जात आहे. काल (मंगळवार, 29 डिसेंबर) संध्याकाळी हेलिकॉप्टरनं तो सिंधुदुर्गात दाखल झाला असून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहे. सिंधुदुर्गात दाखल होताच निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी त्यांचे स्वागत केले. तसंच आमिरने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

आमिर खान ने कोकण दौऱ्याबाबत गोपनियता बाळगली असली तरी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी आमिर कोकणात दाखल झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अलिकडेच आमिर खान ने 'लाल सिंह चड्डा' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमात आमिर-करीनाची जोडी पाहायला मिळणार आहे. (लाल सिंह चढ्ढा च्या शूटिंग दरम्यान आमिर खान याला दुखापत, औषध घेत अभिनेत्याने पूर्ण केले सिनेमाचे चित्रीकरण)

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण विविध प्लॅन्स करत असतात. यंदाचे 2020 हे वर्ष काहीसं वेगळं आणि समस्यांनी भरलेलं होतं. त्यामुळे या वर्षात पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नववर्षाकडे आशेने पाहत आहोत. तसंच या वर्षात निर्माण झालेली नकारात्मकता दूर सारून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी सारेच जण नववर्षाची उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहत आहे.