Yash (PC - Twitter)

KGF Chapter 2: साऊथचा प्रसिद्ध चित्रपट KGF Chapter-2 पाहिल्यानंतर तेलंगणातील 15 वर्षांच्या मुलाने सिगारेटचे (Cigarettes) संपूर्ण पॅकेट प्यायले. चित्रपटाचा नायक रॉकी भाई (Rocky Bhai) याच्यापासून प्रेरित होऊन मुलाने सिगारेटचे पॅकेट प्यायल्याचे सांगितले जात आहे. सिगारेट ओढताच मुलाची प्रकृती ढासळू लागली. या सर्व प्रकारामुळे मुलाच्या घशात तीव्र वेदना आणि खोकल्याची समस्या सुरू झाली. प्रकृती ढासळत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

सेंच्युरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शनिवारी सांगितले की, किशोरवयीन मुलावर उपचार सुरू आहेत. मुलाचे समुपदेशनही करण्यात आले आहे. मुलाला समजावून सांगितले आहे की, त्याने भविष्यात धूम्रपानासारख्या गोष्टींपासून दूर राहावे. (हेही वाचा - Cyber Fraud: निर्माते बोनी कपूरसोबत सायबर फसवणूक, क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपये ट्रान्सफर)

पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रोहित रेड्डी पाथुरी यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर मुले रॉकीसारख्या पात्रांनी सहज प्रेरित होतात. अशा परिस्थितीत मुलांवर वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टींचा चित्रपटात वापर न करणे ही चित्रपट निर्माते आणि कलाकारांची नैतिक जबाबदारी आहे. चित्रपटांमधील धूम्रपानासारख्या गोष्टींचे प्रमोशन टाळले पाहिजे.

डॉ. रोहित रेड्डी यांनी पुढे सांगितलं की, सर्वात मोठी जबाबदारी पालकांची आहे. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे की, ते चुकीच्या मार्गावर जात नाहीत. मुलांच्या हालचालींवर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे, तो काय करतोय, कुठे जातोय, त्याच्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होत आहे. मुलांना धुम्रपानापासून वाचवण्यासाठी पालकांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे. सिगारेट ओढणे आणि दारू पिणे हे अत्यंत चुकीचे आहे. याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे पालकांनी मुलांना सांगितले पाहिजे.