Year Ender 2018 : या वाद-विवादांनी रंगले बॉलीवूडचे 2018 हे वर्ष
बॉलीवूडमधील वादविवाद (संग्रहित - संपादित प्रतिमा)

वाद विवाद आणि बॉलीवूड यांचे नाते फार जुने आहे. चित्रपट लिहिण्याच्या प्रक्रियेपासून ते प्रदर्शनापर्यंत निर्मात्यांच्या डोक्यावर अक्षरशः टांगती तलवार असते. कोणत्यावेळी कोणत्या बाबतीत टीका होईल हे काही सांगता येणार नाही. 2018 मध्येही जितके चांगले चित्रपट आले तितकेच चित्रपटांमुळे वाद निर्माण झाले. 2018 मध्ये अनेक निर्माते, अभिनेते, चित्रपट मुख्य पानावरची हेडलाईन बनले. काही अंशी अशा गोष्टींचा फायदा त्या चित्रपटाला किंवा त्या कलाकारालाही होतो. मात्र काही वेळा हा वाद विवाद फक्त त्या चित्रपटापुरताच मर्यादित न राहता एक सामाजिक मुद्दादेखील बनतो. चला तर पाहूया 2018 मधील असेच बॉलीवूडला हादरवून टाकणारे काही वाद विवाद

पद्मावत – चित्रपट प्रदर्शनादरम्यान बॉलीवूडमध्ये सर्वात मोठा हंगामा झाला तो पद्मावतवेळी. राणी पद्मावतीच्या वीरमरणावर आधारीत पद्मावतला देशातील करणीसेनेकडून कडाडून विरोध झाला होता. यामुळे ठीकठिकाणी दंगे झाले होते, जाळपोळ झाली होती. शेवटी चित्रपटाचे नाव पद्मावती बदलून पद्मावत केल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

#MeToo – 2018 मधील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला विषय म्हणजे #MeToo. या कॅंपेन अंतर्गत सर्वप्रथम तनुश्री दत्ताने आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडली. नाना पाटेकरसह गणेश आचार्य आणि अजून दोघांवर तिने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर हळू हळू चित्रपटसृष्टीमधील अनके तरुणींनी त्यांची ‘आप बीती’ जगासमोर मांडली. यामध्ये अलोकनाथ, विकास बहल, रजत कपूर, चेतन भगत, तन्मय भट्ट   यांच्यासारखी अनेक दिग्गजांची नावे समोर आली, ज्याने बॉलीवूडसह जनताही शॉक झाली होती.

जितेंद्र आणि विनयभंग - अभिनेता जितेंद्र यांच्यावर त्यांच्याच नात्यातल्या एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता. इतकेच नाही तर याबाबत तिने शिमला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. या महिलेने एका पत्रातून तब्बल 47 वर्षांपूर्वी शिमल्याच्या एका हॉटेलमध्ये जितेंद्र यांनी आपला विनयभंग केल्याचे सांगितले. मात्र जितेंद्र यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

सलमान खानला धमकी - जानेवारी महिन्यात लॉरेन्स बिष्णोई नामक व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिष्णोई समाजाचा आहे. या समाजात काळवीटाची पूजा केली जाते. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाच्या परिसरातच त्याने सलमानला जानेवारी महिन्यातच जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास असलेल्या संपत नेहराला अटक केली. सलमान खानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवली होती.

प्रियंका चोप्रा आणि भारत – प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिलेला सलमान खानचा चित्रपट म्हणजे ‘भारत’. यातील अजून एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे प्रियंका चोप्रा. मात्र इतका मोठा चित्रपट प्रियंका चोप्राने अगदी शेवटच्या क्षणी साईन करून सोडला. याबाबत तिने कोणतेही कारण सांगितले नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास झफर (Ali Abbas Zafar) यांनी, तिच्या लग्नामुळे ती या चित्रपटामधून बाहेर पडली असे सांगितले. मात्र प्रियंकाने याबाबतीत कधीच तिचे स्पष्टीकरण दिले नाही. शेवटी सलमानने कतरिनाला घेऊन चित्रपटाचे काम सुरु केले.

मणिकर्णिका विवाद – कंगना राणावतचा ‘मणिकर्णिका’ जानेवारीमध्ये प्रदर्शित होत आहे. मात्र त्या आधीच चित्रपट अनेक विवादांमध्ये अडकला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी चित्रपटाचे काम पूर्ण करून आपला पुढचा प्रोजेक्ट सुरु केला. मात्र निर्मात्यांच्यामते चित्रपटात अजून काही काम करणे बाकी होते, अशावेळी कंगना एक दिग्दर्शक बनून पुढे आली. तिने चित्रपटाचे काही सीन्स पुन्हा शूट केले तसेच संपूर्ण संकलन स्वतःच्या डोळ्यादेखत पार पाडले. अशावेळी दिग्दर्शक म्हणून तिचेही नाव जावे अशी मागणी करण्यात आली होती. शेवटी अनेक वाद विवाद झाल्यानंतर क्रिश यांच्यासोबत कंगनाचेही नाव दिग्दर्शक म्हणून झळकले.