चित्रीकरणादरम्यान या कारणामुळे खराब झाला भूमी पेडणेकरचा चेहरा; होरपळलेली त्वचा आणि काळ्या डागांचा फोटो व्हायरल
Bhumi Pednekar. (Photo Credits: Instagram@Bhumi)

‘दम लगा के हईशा’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये भूमीने दमदार भूमिका सादर करून अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. आता तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर 'सांड की आंख' (Saand Ki Aankh) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री वृद्धोवृद्ध खेळाडू महिलांची भूमिका साकारत आहेत. यासाठी दोघींनाही चेहऱ्यावर अतिशय मेकअप करावा लागत आहे. सध्या बाहेर सूर्य तळपत असताना, अशा हेवी मेकअपमध्ये शुटींग केल्याने भूमीचा चेहरा पूर्णतः बिघडला आहे. सध्या तिच्या चेहऱ्याचा एक फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये भूमीच्या चेहऱ्यावर अनेक डाग पडलेले दिसून येत आहे. चेहरा पूर्णतः होरपळला असून, अक्षरशः जळल्याचा फील येत आहे.  सुरुवातीला चेहऱ्यावरील डाग मेकअप असल्याचे वाटत होते. परंतु नंतर खरोखरंच भूमीचा चेहरा खराब झाल्याचे समजले आहे. या चित्रपटासाठी भूमीला दररोज कमीत कमी 3 तास मेकअप करावा लागतो. या चित्रपटाचे शुटींग उत्तर प्रदेश येथे चालू आहे, तिथे प्रचंड उकाडा असल्याने, तसेच धुळीमुळे भूमीच्या चेहऱ्यावर डाग पडले आहेत. (हेही वाचा: 'तिल गुड घ्या गोड गोड बोला' गुढी पाडव्याच्या शुभेच्छा; अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचा नवा शोध)

तुषार हीरानंदानी दिग्दर्शित 'सांड की आंख'मध्ये भूमि पेडणेकर चंद्रो तोमर यांची भूमिका साकारत आहे. तसेच याशिवाय भूमीचे अजून 5 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. डॉली किट्टी और वो चमकते सितारे, पती पत्नी और वो, बाला, तख्त याशिवाय एका हॉरर चित्रपटात भूमी दिसणार आहे.