Bala Vs. Ujda Chaman: 'तारीख पे तारीख'च्या खेळामध्ये बालाचं 'उपर एक'; चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा Preponed
Battle Of Balds | (Picture Credit: Instagram)

'बाला' (Bala) आणि 'उजडा चमन' (Ujda Chaman) मधला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. अकाली आलेल्या टकलेपणावर भाष्य करणारे हे दोन्ही चित्रपट. दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर सुद्धा काही दिवसांच्या फरकानेच रिलीज करण्यात आले. त्यावेळी दोन्ही सिनेमांमधलं साम्य स्पष्टपणे दिसत होतं. इतकच नाही तर दोन्ही ट्रेलर सुद्धा बऱ्याच प्रमाणात साधर्म्य साधणारे होते. तेव्हा आपापले चित्रपट अगोदर प्रदर्शित करण्याची चढाओढ सुरु झाली. ती आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उजडा चमनने आपलं प्रदर्शन अलीकडे घेऊन 1 नोव्हेंबर निश्चित केली होती. पण आता बालाने 'उपर एक' करत त्यांची तारीख 31 ऑक्टोबर निश्चित केली आहे. दोन्ही चित्रपटांच्या तारखा खूप वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी यांचा तारीख पे तारीखचा खेळ थांबतोय का, हा प्रश्न आहे.

'हाऊसफुल 4' (Housefull 4) परवाच रिलीज झाला आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. पण आता दोन्ही निर्माते हे तिकीटबारीवर होणाऱ्या परिणामाचा विचार करण्याच्या पुढे गेले आहेत. बालाने आपली आधीची तारीख 8 नोव्हेंबर बदलून अलीकडे घेतल्यामुळे, आणि ती सुद्धा अगदीच काही दिवसांवर आणून ठेवल्या कारणाने चित्रपटाचं प्रमोशन वगैरे या सगळ्या गोष्टींची गणितं सोडवावी लागणार आहेत. उजडा चमनचीही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. आता उजडा चमनचे निर्माते या गोष्टीला कसे उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. (हेही वाचा. अभिनेता आयुषमान खुरानाविरोधात गुन्हा दाखल, चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप)

उजडा चमनच्या निर्मात्यांनी आधीच बालाच्या निर्मात्यांवर वाङ्मयचौर्याची केस टाकली आहे. उजडा चमन ज्या कन्नड चित्रपटावरून घेतला आहे, त्याचे अधिकृत अधिकार असल्याचं सांगत प्रदर्शन थांबवण्याची विनंती कोर्टाला केली होती. तर दुसरीकडे कमल चंद्राने बालावर आपल्या 'विग' या चित्रपटावरून कथा घेतली असल्याचा आरोप केला आहे.

आता हे चित्रपट नक्की ठरल्या दिवशीच प्रदर्शित होतात का आणि कुठला चित्रपट बाजी मारतो हे पाहावं लागेल.