Photo Credit- Instagram

Arrest Warrant Issued for Sonu Sood: सोनू सूद नुकतेच त्यांच्या चित्रपट 'फतेह'मुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट नुकताच 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सोनू सूद यांनी केले आहे. दरम्यान, आता अभिनेता अटक वॉरंटमुळे चर्चेत आला आहे. लुधियानाच्या न्यायदंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले आहे. सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आणि वॉरंटच्या अंमलबजावणीचा अहवाल १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सोनू सूदला 10 लाखांच्या फसवणुकीच्या प्रकरणात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अभिनेता सोनू सूदला अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले आहे. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, हे वॉरंट मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.

येथे पाहा पोस्ट:

मिळालेल्या माहितीनुसार,  मोहित शुक्ला विरोधात लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी हा खटला दाखल केला होता. बनावट रिझिका नाण्यामध्ये गुंतवणूक करून त्यांची फसवणूक करण्यात आली, ज्यामुळे १० लाखांचे नुकसान झाले, असा आरोप आहे. या प्रकरणी सोनू सूदला कोर्टात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो हजर न राहिल्याने कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. कोर्टाच्या कागदपत्रात म्हटले आहे की, "सोनू सूद कोर्टात हजेरी लावत नसून टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आरोपी सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पोलीस या अटक वॉरंटची अंमलबजावणी कशी करतात आणि सोनू सूद यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.