शाहरुख खानला बॉलीवूडचा बादशहा म्हटले जाते, तर त्याची पत्नी गौरी खानला क्वीनची उपाधी दिली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. इंडस्ट्रीमधील सर्वात सुखी, समाधानी जोडी म्हणून शाहरुख-गौरीकडे पाहिले जाते. त्यांची लव्हस्टोरी देखील हटके आहे. ज्या वेळी शाहरुखकडे काहीच नव्हते तेव्हा गौरीने त्याचा स्वीकार केला होता. प्रत्येक सुख-दुःखात तिने शाहरुखची सावली सारखी सोबत कली, त्यामुळे आज शाहरुखच्या यशामागे गौरीचा हात आहे असेच म्हणावे लागेल. आज ही जोडी त्यांच्या लग्नाचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त पाहूया नक्की काय होती शाहरुख-गौरीची प्रेमकहाणी.
शाहरुख 19चा तर गौरी 14ची होती जेव्हा या दोघांनी एकमेकांना एका पार्टीमध्ये पहिले होते. पाहताक्षणीच शाहरुखला गौरी आवडली, मात्र गौरीने शाहरुखशी बोलायला नकार दिला. मात्र शाहरुखने तिचा पाठपुरावा केला आणि बॉलीवूडच्या या सर्वात रोमँटिक हिरोच्या प्रेमात गौरी पडलीच. यानंतर काही दिवसातच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. एकमेकांना व्यवस्थित जाणून घेतल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गौरीच्या आई-वडिलांनी या नात्याचा पूर्णपणे विरोध केला. पुढे जाऊन दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने लग्नामध्ये विघ्न येऊ शकते याची कुणकुणदेखील शाहरुख-गौरीला होतीच. त्यामुळे गौरीच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी शाहरुखने तब्बल 5 वर्षे हिंदू असल्याचं नाटक केले. यानंतर शाहरुखच्या स्वभावावर गौरीचे पालक इम्प्रेस झाले आणि 25 ऑक्टोबर 1991साली ते दोघेही विवाहबंधनात अडकले.
शाहरुख-गौरी एकमेकांना डेट करत असतानाचा एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. एकदा शाहरुखला न सांगता गौरी तिच्या मित्रांसोबत मुंबईला आली होती. शाहरुख गौरीबद्दल अतिशय पझेसिव्ह असल्याने जेव्हा शाहरुखला ही गोष्ट समजली तेव्हा त्याला अजिबात चैन पडेना. उतावीळ होऊन शाहरुखनेही गौरीपाठोपाठ मुंबई गाठली, आणि गौरीला शोधण्यासाठी इतक्या मोठ्या शहरातील सर्व बीचेस पालथे घातले. कारण त्याला माहित होते गौरीला बीचेस फार आवडतात. त्यामुळे ती कोणत्या ना कोणत्या बीचजवळ आढळेलच. शाहरुखचे हे असे प्रेम पाहून याचवेळी गौरीने शाहरुखशी लग्नाचा निर्णय घेतला होता.