प्रताप फड (Pratap Phad) दिग्दर्शित 'अनन्या' या (Ananya) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 22 जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.
‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’ (हे देखील वाचा: Sher Shivraj: ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध)
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मिती 'अनन्या' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनी सांभाळली आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची जबाबदारी निभावली आहे.