
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात एक महायुद्ध सुरु आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण देशवासिय देखील या लढ्यात सहभागी झाले आहेत. आपले घरापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावणा-या कोरोना वॉरियर्ससाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक सुंदर गाणे गाऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या गाण्याचे बोल आहेत 'मंदिर तू, तू ही शिवाला'. नुकतेच हे गाणे युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
गेल्या 2 महिन्यांपासून देशातील सर्व वैद्यकिय तसेच शासकीय यंत्रणा कोरोनाशी लढा देण्यासाठी अहोरात्र जनतेची सेवा करत आहेत. अशा या योद्धांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे बळ आणखी वाढविण्यासाठी अमृता फडणवीसांनी हे गाणे गायिले आहे.
आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून राजू सपकाळ यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. याआधीही अनेक कलाकारांनी कोरोनावर गाणी प्रदर्शित करून कोरोना विरांचे आभार मानले आहेत.
भारतात सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 39,980 वर पोहोचली आह. यातील 10633 रुग्ण बरे झाले असून 1301 रुग्ण दगावले आहेत. सद्य स्थितीत 28,046 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रात काल 36 लोकांचा मृत्यू झाला असून दिवसभरात 790 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 12 हजार 296 चा आकडा गाठला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.