इस्रो (ISRO) ची मंगळ मोहीम ही भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरली होती. या मोहिमेमुळे इस्रोचे नाव संपूर्ण जगात दुमदुमले होते. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या मोहिमेवर आधारीत ‘मिशन मंगल’ (Mission Mangal) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकीकडे प्रत्येकाच्याच मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे, मात्र दुसरीकडे मनसे (MNS) ने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. मिशन मंगल हा चित्रपट हिंदी असून तो मराठीमध्ये डब करण्यावर मनसेने आक्षेप घेतला आहे.
नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून, 'ये सिंदूर'(Yeh Sindoor) हा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. मंगळयान मोहिमेत मोलाचा हातभार लावलेल्या नारीशक्तीला सलाम करण्यासाठी, अक्षय कुमारच्या आवाजातील मराठी कविता या प्रोमोमध्ये ऐकायला मिळते. या मध्ये सिनेमाची झलकही पाहायला मिळत आहे. मात्र अशाच प्रकारे हा संपूर्ण चित्रपट मराठीमध्ये डब होत असेल तर त्याचा परिणाम मराठी चित्रपटांच्या शोजवर होऊ शकतो, म्हणून मनसेने याला विरोध केला आहे. हा चित्रपट हिंदीतून प्रदर्शित होण्यास आमचा विरोध नाही असेही मनसेने म्हटले आहे. (हेही वाचा: Yeh Sindoor Marathi: नारी शक्तीला सलाम करणारा 'अक्षय कुमार' च्या आवाजातील Mission Mangal चा खास मराठी प्रोमो (Watch Video))
महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना शोज मिळत नाहीत म्हणून मनसे अनेक वर्षे आंदोलन करत आहे. यामुळे आता कुठे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. त्यात हिंदी चित्रपट मराठीमध्ये डब झाले तर मराठी चित्रपटांचे काय होईल? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याविरोधातच मनसेने आवाज उठवला आहे. दरम्यान, 'मिशन मंगल' या सिनेमात शर्मन जोशी, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि किर्ती कुल्हारी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एस. शंकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.