अभिनेत्रीला One night stand बद्दल विचारणाऱ्या व्यक्तीला मिळाले हे उत्तर
नेहा सक्सेना (Photo Credits: Facebook)

भारतात #MeToo चळवळीची व्याप्ती अजूनही वाढत आहे. इतके वर्षे सभ्यपणाच्या पडद्यामागे लपून राहिलेली नावे अचानक बाहेर आली, आणि एका स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावे लागते याची प्रचीती यायला लागली. सोशल मिडियावर हा ट्रेंड इतका व्हायरल झाला असूनही अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांवर जरब बसली नाही. एखाद्या स्त्रीसाठी तिच्या शारीरिक छळासोबतच मानसिक छळही तितकाच महत्वाचा असतो, याचेच एक उदाहरण नुकतेच दिसून आले. मल्याळम अभिनेत्री नेहा सक्सेना (Neha Saxena)च्या पीआर ला एका व्यक्तीने विचारलेला प्रश्न पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल किंवा असे प्रकार खरच घडतात यावर विश्वासही बसणार नाही.

नेहाच्या पीआरला एका व्यक्तीने मेसेज करून विचारले की, नेहा दुबईमध्ये ‘वन नाईट स्टँड’ (One night stand) साठी उपलब्ध आहे का? आणि जर असेल तर मला कळवा. यावर नेहाच्या पीआरने या व्यक्तीला खडे बोल सुनावले आहेत. तिने लिहिले आहे की, ‘एखाद्या महिलेसोबत अशा प्रकारे वर्तन केल्याने, आता मी तुला मिडियासमोर घेऊन येऊन थोडी प्रसिद्धी देते.’ अभिनेत्री नेहाने देखील या स्क्रीनशॉट्ससोबत एक मोठी पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. या पोस्टमध्ये नेहाने तिच्या दुबईयेथील मित्रांकडून या व्यक्तीबद्दल माहिती प्राप्त करून घेण्यास मदत मागितली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्या मित्रांनी त्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबर नेहाला मिळवून दिला. मात्र या व्यक्तीच्या परिवाराने त्याच्या फोन हॅक झाला असल्याचे सांगितले. मात्र जो पर्यंत ही गोष्ट सिद्ध होत नाही तो पर्यंत आपण वाट पाहू असे नेहाने सांगितले आहे.

नेहा ही मल्याळम चित्रपटसृष्टीमधील एका लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'कसाबा'  या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली होती. या चित्रपटात अभिनेता ममुटीची देखील मुख्य भूमिका होती.