Vikram S Kirloskar Passes Away: टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Vikram Kirloskar | | (Photo Credits: Twitter/@Toyota_India)

Vikram Kirloskar Passed Away: प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने त्यांचे निधन झाले. टोयोटा किर्लोस्कर मोटारचे (Toyota Kirloskar Motor) उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांनी MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. भारतामध्ये टोयोटा कार लोकप्रीय करण्यात विक्रम किर्लोस्कर यांचा मोठा वाटा होता. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये विविध महत्त्वाच्या पदांवरुन चमकदार कामगिरी केली. बंगळुरु येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज (बुधवार, 30 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाची माहिती टोयोटा इंडियानं (Toyota India) आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ''29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर यांचे अकाली निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करावी अशी विनंती करतो.आम्ही त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. (हेही वाचा -Vikram Gokhale Passes Away: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, पुणे येथे 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

पीटीआय ट्विट

टोयोटा इंडिया ट्विट

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर असलेल्या विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांनी आपला पीढीजात उद्योग अधिक उंचीवर नेण्यास मोठा हातभार लावला. किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली.