Tesla Leases Office Space in Pune: टेस्लाने पुण्यात भाड्याने घेतली कार्यालयाची जागा; लवकरच भारतीय बाजारपेठेत करणार प्रवेश, जाणून घ्या सविस्तर
Elon Musk | (Photo Credit - Twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून एलोन मस्क (Elon Musk) यांची कंपनी टेस्ला (Tesla) भारतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजूनतरी कंपनीला पूर्णतः यश प्राप्त झाले नाही. अजूनही टेस्लाचे उच्च अधिकारी भारतातील सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा करत आहेत. अशात एक मोठे अपडेट समोर आले आहे. मस्कची टेस्ला कंपनी लवकरच पुण्यात (Pune) येणार आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी विमान नगर येथे कार्यालयासाठी प्रशस्त जागा भाडेतत्त्वावर घेणार आहे. याचा अर्थ लवकरच कंपनी भारतात गुंतवणूक करेल.

ऑक्टोबरपासून, कंपनीला विमान नगर, लोहेगाव येथील पंचशील बिझनेस पार्कच्या टॉवर बी मध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा व्यवसाय चालवण्यासाठी जागा प्राप्त होईल. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीजकडून एकूण 5,850 चौरस फूट जागा 11.65 लाख रुपये प्रति महिना भाड्याने टेस्लाला देण्यात आली आहे. सीआरई मॅट्रिक्स या रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्मद्वारे हे दस्तऐवज उपलब्ध झाले आहेत. ज्यानुसार, या जागेसाठी 34.95 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले असून, भाडे दस्तऐवजाची नोंदणी 26 जुलै रोजी करण्यात आली.

भाडे करारातील तपशील दर्शविते की कंपनीला पाच कार पार्किंग आणि 10 दुचाकी पार्किंग स्लॉट देखील मिळतील. ही लीज 36 महिने किंवा 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह 60 महिने किंवा 5 वर्षांसाठी आहे. `दरवर्षी याचे भाडे 5 टक्क्यांनी वाढेल. फ्लोर लेआउट प्लॅनमध्ये 3 कॉन्फरन्स किंवा मीटिंग रूम आणि स्टाफसाठी 41 जागा असतील. (हेही वाचा: Mercedes-Benz G-Class भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

अहवालानुसार, टेस्ला 5 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी आणि भारतीय उपखंडाव्यतिरिक्त इंडो-पॅसिफिक बाजारपेठेची पूर्तता करण्यासाठी देशाला निर्यात केंद्रांपैकी एक बनवण्यासाठी भारतात कारखाना सुरू करण्याचा विचार करत आहे. याआधी 2022 मध्ये, कार आयात करण्यासाठी विशेष प्रोत्साहन नसल्यामुळे कंपनीची भारतात बेस स्थापन करण्याची योजना मागे पडली होती. दरम्यान, नुकतेच टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा मस्क यांनी सांगितले होते की, ते देशात कार-निर्मिती सुविधेत गुंतवणूक करत आहेत.