देशातील बहुतांश भागात कडाक्याचा उन्हाळा (High Heat) सुरु झाला आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणि वाढत्या तापमानाची नोंद होत आहे. वाढत्या उष्णतेचा फटका केवळ मानव आणि प्राणीच नाही तर वाहनांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच, इंटरनेटवर एक ट्विट समोर आले आहे ज्यामध्ये टाटा हॅरियरच्या (Tata Harrier) मालकाने तक्रार केली की, त्याच्या एसयूव्हीचा बंपर आणि लोखंडी जाळी बेंगळुरूच्या कडक उन्हात वितळली आहे. या व्यक्तीने त्याची गाडी बाहेर पार्क केली होती. या गाडी मालकाने एसयूव्हीच्या वितळलेल्या पॅनल्सची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत.
सौरव नाहटा यांनी ट्विटरवर त्यांच्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये, त्यांनी नमूद केले आहे की ते डिसेंबर 2021 पासून टाटा हॅरियर वापरत आहेत. बिल्ड क्वालिटीच्या सकारात्मक रिव्ह्यूजमुळे त्यांनी ही कार खरेदी केली होती. मात्र आता गाडीचा बंपर आणि लोखंडी जाळी उन्हात वितळल्याने त्यांची निराशा झाली आहे. बेंगळुरूमध्ये 12 एप्रिल रोजी त्यांची कार 10 तास उन्हात उभी असताना हा प्रकार घडला.
I drive a Tata Harrier since Dec 2021. My reasons for buying Tata Harrier:
1. Good reviews on @TeamBHPforum
2. Excellent build quality reviews online
This is what happened standing for 10 hr in Bangalore Sun on 12th April
and @TataMotors_Cars is asking me to pay for it now! pic.twitter.com/TUbLA8OSSO
— Saurav Nahata (@iamsauravnahata) April 18, 2023
सौरव यांचे म्हणणे आहे की, गाडी ठीक करण्यासाठी टाटा मोटर्स त्यांच्याकडे पैसे मागत आहे. ते पुढे म्हणतात टाटा मोटर्स द्वारे अशा घटनेला इतक्या हलक्यात घेतले जाते याचे त्यांना खरोखरच आश्चर्य वाटते. सौरव यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे सीसीटीव्ही पुरावे आहेत जे त्यांच्या कार्यालयाने विनंती केल्यावर उपलब्ध करून दिले होते. ज्यामध्ये दिसत आहे की, मेड इन इंडिया टाटा कार सूर्यप्रकाशात वितळली आहे. (हेही वाचा: Audi Q7 च्या ब्रेकमध्ये आढळली समस्या; ग्राहकाला 60 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक विवाद निवारण आयोगाचे Volkswagen ला आदेश)
तुम्ही या ट्विटचा कमेंट किंवा रिप्लाय सेक्शन पाहिल्यास, तुम्हाला दिसेल की कार निर्मात्याने ग्राहकाला उत्तर दिले आहे. मात्र असे दिसून येते की ग्राहक त्यांच्या उत्तराने समाधानी नाही. दरम्यान, Tata Harrier ही सध्या देशातील सर्वात लोकप्रिय एसव्हीयूपैकी एक आहे. ही गाडी 2019 पासून बाजारात आहे आणि कार निर्माता सध्या या एसव्हीयूच्या फेसलिफ्टवर काम करत आहे. अशाप्रकारे उन्हात कार वितळल्याची ही घटना बहुधा प्रथमच समोर आली आहे.