अमेरिकेची मोटारसायकल उत्पादक कंपनी हार्ले-डेव्हिडसनने (Harley Davidson) भारतात आपली विक्री व उत्पादन प्रक्रिया बंद करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने जाहीर केले होते की, आपले उत्पादन पोर्टफोलिओ कमी करणे आणि कमी-प्रमाणात बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणी काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. हार्ले अमेरिकेची तिसरी कंपनी आहे, जिने भारतामधील त्यांचे शोरूम बंद केले आहे. कंपनीने आपल्या खर्चामध्ये 75 दशलक्ष डॉलर्सची कपात करण्याची योजना आखली असून, त्याद्वारे ती भारतातील उत्पादन बंद करीत आहे. कंपनी आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करणार आहे.
हार्लेने प्रीमियम बाइक्स विभागात आपले स्थान मिळवले आहे. मात्र आता भारतातील सततच्या घटत्या मागणीमुळे कंपनीने भारतीय बाजारातून बाहेर पडायचे ठरवले आहे. हार्लेच्या या निर्णयामुळे कंपनीतील सुमारे 70 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. त्याचबरोबर कंपनीचे संचालक संजीव राजशेखरन यांची सिंगापूर येथे बदली झाली आहे, जेथे ते आशियातील मुख्य अधिकारी म्हणून काम पगातील.
हार्ले डेव्हिडसन यांनी एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये ते म्हणतात, ‘काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कंपनी बाहेर पडत आहे आणि भारतातील आपली विक्री व उत्पादन कामे बंद करीत आहे.’ दोन महिन्यांपूर्वी हार्ले डेव्हिडसनने अमेरिकेसारख्या अधिक फायदेशीर बाजाराकडे लक्ष देण्याची रणनीती उघड केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एकूण विक्रीपैकी केवळ 5 टक्के विक्री भारतीय बाजारातून येते. हार्लीची भारतात हरियाणाच्या गुडगाव येथे शाखा आहे, जी ऑगस्ट 2009 मध्ये सुरू झाली. जुलै 2010 मध्ये, कंपनीने त्याच शाखेत आपली पहिली डीलरशिप नियुक्त केली होती. (हेही वाचा: Tata कंपनी भारतात घेऊन येणार नव्या 3 इलेक्ट्रिक गाड्या, सिंगल चार्जमध्ये 300km चे अंतर धावणार)
दरम्यान, आर्थिक वर्ष 2019-2020 मध्ये कंपनीने भारतात केवळ 2,500 बाइक्सची विक्री केली. एप्रिल ते जून या कालावधीत यावर्षी कोरोना साथीच्या आणि ऑटो क्षेत्रात सुरू असलेली मंदी यांच्या दरम्यान कंपनी एप्रिल ते जून या कालावधीत केवळ 100 बाइक्स विकू शकली आहे.