तब्बल 35 वर्षांनतर मारुती कंपनीकडून ओमनी गाडीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय
मारुती ओमनी (Photo Credit : Youtube)

एकेकाळी संपूर्ण कुटुंबाची कार म्हणून ओळखली गेलेली, नंतर ‘किडनॅप कार’ म्हणून लोकप्रियता प्राप्त झालेल्या ओमनी (Omni) कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मारूती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीकडून गेली 35 वर्षे या गाडीची निर्मिती केली जात होती. सुरुवातीला मारुती 800 ही कार लाँच केली होती, त्यानंतर ओमनी 1984 मध्ये लाँच करण्यात आली होती. मात्र आता नवीन रस्ते नियम आल्याने कंपनीकडून हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.

सरकारकडून एबीएस, एअरबॅग आणि बीएसव्हीआय यांची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्याची जुनी उत्पादने बंद करण्याच्या सुचना कंपन्यांना दिल्या आहेत. मारुतीचे ओमनी हे मॉडेल सेवेन्थ जनरेशन सुझुकी सुपर कॅरीनुसार कार्य करते. परंतू यामध्ये काही नियमांनुसार बदल केले गेले नाहीत. परिणामी कंपनीला हे मॉडेल बंद करण्यासारखे मोठे पाऊल उचलावे लागले आहे.

विशेष म्हणजे, या कारची आताही विक्री चांगल्याप्रकारे सुरू होती. ओमनी आपल्या ग्राहकांना कस्टमायझेशनचा पर्यायही देत होती. म्हणजेच ग्राहक आपल्या सोयीनुसार, बॉडी टाईप्स निवडू शकत होते. म्हणूनच गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत मारूतीने ओमनीच्या तब्बल 15.7 मिलियन गाड्यांची विक्री केली होती. (हेही वाचा: 33 वर्षांनंतर थांबणार मारुती सूझुकी कंपनीच्या 'जिप्सी' गाडीचं प्रोडक्शन)

ओमनीचे उत्पादन जरी बंद करण्यात येणार असले तरी, कंपनीकडून त्याच धर्तीवर 'मारुती सुझुकी इको एमपीएव्ही' (Eeco MPV) नावाची गाडी बाजारात आणली गेली आहे. या गाडीमध्ये अनेक अपडेटेड फिचर्स देण्यात आले आहेत. यात को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमायंडर, रिव्हर्स पार्किंग या फिचर्सचा समावेश आहे. अपडेटेड मारुती इकोच्या (Maruti Eeco) सुरुवातीच्या एक्स शोरुमची किंमत 3.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.