जगातील अनेक कंपन्या आपल्या जुना एसयूव्ही (SUV) गाड्यांना नव्या ढंगात, नव्या अपडेट्ससह सादर करत आहेत. असेच वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने शुक्रवारी आपल्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार टीयूव्ही300 (TUV300)च्या अद्ययावत मॉडेलला, फेसलिफ्ट व्हर्जनला लॉन्च केले. यावेळी महिंद्राने सांगितले की, ‘बोल्ड न्यू टीयूव्ही 300' चे डिझाईन बदलले आहे. यामध्ये पियानो ब्लॅक फ्रन्ट ग्रिल, एक्स आकाराचे मेटेलिक ग्रे व्हील कव्हर यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या टीयूव्ही 300 च्या नवीन व्हेरीएंटमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, जीपीएससह 17.8 सेमी इंफोटेनमेंट सिस्टिम, स्टॅटिक बेंडिंग हेडलँप्स आणि मायक्रो-हायब्रिड टेक्नोलॉजी दिली गेली आहे. ही गाडी, हायवे रेड, मिस्टिक कॉपर, स्टायलिश ड्युअल टोन, लाल आणि काळा, चंदेरी आणि काळा, काळा, मॅजेस्टिक सिल्व्हर आणि पर्ल व्हाइट अशा रंगात उपलब्ध आहे. (हेही वाचा: 'महिंद्रा'ने सादर केली जगातील सर्वात वेगवान कार; 2 सेकंदात पकडणार 100 KPH गती, पहा वैशिष्ठ्ये)
कारमध्ये 1.5 लीटरचा तीन सिलेंडर असलेले डिझेल इंजिन दिले आहे, जे 100 हॉर्सपावरची शक्ती देते. या कारमध्ये 5 स्पीड युनिट असलेल्या मॅन्युअल गियरबॉक्सला देण्यात आला आहे. तसेच 1.5 लीटरचे लो रेटेड डिझेल इंजिन दिलेले आहे, जे 80 हॉर्सपावरची शक्ती देतो. यामध्ये ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. TUV300 मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS+EBD आणि कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल सिस्टिमद्वारे सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे.
TUV300 फेसलिफ्ट व्हर्जनची, T4+ व्हेरिअंटची मुंबई एक्स-शोरूम किंमत 8.38 इतकी आहे, T6+ ची 8.98 लाख, T8 ची 9.62 लाख तर, टॉप एंड T10 ड्युअल टोनची किंमत 10.41 लाख रुपये आहे.