Pininfarina Battista (Photo Credit : Motor Authority)

कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिनेवा मोटर शो-2019 (Geneva International Motor Show) मध्ये जगातील सर्वात वेगवान कार सादर केली गेली आहे. ही कार भारतीय कंपनी ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’ ची मालकी असणाऱ्या इटालीयन कंपनी ‘ऑटोमोबाइली पिनिनफेरिना’ने (Automobili Pininfarina) बनवली आहे. ‘बतिस्ता’ (Battista) असे या कारला नाव देण्यात आले असून, या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे ही कार अवघ्या 2 सेकंदामध्ये 100 किलोमीटर प्रती तास एवढा वेग पकडू शकते. भविष्यातील संभाव्य समस्या आणि होणारे बदल लक्षात घेऊन या कारची निर्मिती करण्यात आली आहे.

बतिस्ताची खासियत म्हणजे ही कार फॉर्मूला-वन (Formula 1) कारपेक्षाही वेगवान आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी नाही तर ही एक पॉवरफुल इलेक्ट्रिक कार (Electric Car) आहे. या कारमध्ये टॉर्क वेक्टरिंग आणि ऑल-व्हील ड्राइव्ह दिलेला आहे. कारमध्ये प्रत्येक चाकासाठी वेगळ्या अशा चार इलेक्ट्रिक मोटर आहेत. या एकूण 1,873 बीएचपीची पॉवर आणि 2,300 न्यूटन मीटर एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतात, याच कारणामुळे ही गाडी 2 सेकंदात 100 किमी प्रति तास गती घेऊ शकते. 12 सेकंदापेक्षा कमी कालावधीमध्ये या गाडीची गती म्हणजेच वेग 186 किलोमीटर प्रति तास होईल. कारचा टॉप स्पीड 350 किलोमीटर प्रति तास इतका आहे. या गाडीला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 450 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. (हेही वाचा: मारुतीने बदलले Alto चे डिझाईन, दिवाळीपर्यंत नव्या रूपातली गाडी सादर)

साध्या पद्धतीने चार्ज होणारी आणि फास्ट चार्जिंग होणारी अशा दोन प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. कारची कमर्शियल लॉन्चिग 2020 मध्ये होईल. पिनिनफेरिना बातिस्ता या गाडीचे फक्त 150 युनिट्सच तयार केले जाणार आहेत. यातील 50 युरोपमध्ये, 50 उत्तर अमेरिकेत आणि शेवटचे 50 मध्य पूर्व देशांत आणि आशियात पाठवले जातील. सध्या तरी या गाडीची अंदाजे किंमत 22 लाखांहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.