महिंद्रा (Mahindra) कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 जुलै 2019 पासून कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. महिंद्राच्या सर्व पॅसेंजर गाड्यांच्या किंमतीत तब्बल 36 हजार रुपयांनी वाढ करण्यात येईल. एआयएस 145 सेफ्टी नॉर्म्सच्या कारणाने वाहनांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. 1 जुलै 2019 पासून सर्व पॅसेंजर गाड्यांमध्ये एआयएस 145 सेफ्टी नॉर्म्स अनिवार्य केले जातील. याअंतर्गत प्रत्येक कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, सीट बेल्ट रिमायंडर, रिअर पार्किंग सेंसर आणि ओव्हर स्पीड अलर्ट हे फिचर दिले जातील.
हे नवे नियम लक्षात घेऊन महिंद्राने आपल्या वाहनांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे स्कॉर्पिओ, बोलेरो, टीयुव्ही 300 आणि केयुव्ही 100 एनएक्सटी या गाड्यांच्या किंमती प्रामुख्याने वाढल्या आहेत. तर महिंद्रा एक्सयूवी 500 आणि मराजो यांसारख्या मॉडेल्सच्या किंमती काही प्रमाणात वाढतील. अलिकडेच लॉन्च करण्यात आलेल्या महिंद्रा एक्सयूवी 300 च्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही. कारण या कारमध्ये हे फिचर्स पूर्वीपासूनच देण्यात आले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ऑटोमोबाईल सेक्टरचे अध्यक्ष राजन वडेरा यांनी सांगितले की, "आमच्या उत्पादन प्रक्रीयेत सुरक्षा महत्त्वाची आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक गरजांचे आम्ही स्वागत करतो. सुरक्षतेसाठी काही गरजा वाढल्या असल्याने वाहनांच्या किंमतीही वाढल्या आहेत आणि या नव्या किंमती 1 जुलै 2019 पासून लागू करण्यात येतील."