Harley Davidson to Exit India: भारतामध्ये हार्ले डेविडसन मधून 70 कर्मचार्‍यांची कपात; ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध
Harley-Davidson Motorcycle Brand Might Exit India: Report (Photo Credits: Harley-Davidson)

अमेरिकन मोटार बाईक कंपनी हार्ले डेविडसन (Harley Davidson) आता भारतामधील व्यवहार गुंडाळण्याच्या तयारी मध्ये आहे. आता भारतामध्ये हार्ले डेविडसन बाईकची निर्मिती आणि विक्री थांबवणार आहे. दरम्यान या कंपनीच्या 70 कर्मचार्‍यांना कामावरून हटवण्यात येईल आणि सध्या भारतामध्ये असलेल्या ग्राहकांच्या सेवेसाठी लोकल पार्टनरचा शोध सुरू आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, भारतातील हार्ले डेविडसनचे प्रमुख संजीव राजशेखरन यांना देखील सिंगापुरला बदली देण्यात आली आहे.

मागील 10 वर्षांपासून भारतामध्ये प्रिमियम बाईक्स उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून हार्ले डेविडसनची ओळख होती. 2020 मध्ये अपेक्षित व्यवसाय करू न शकल्याने आता हार्ले डेविडसनने भारतातून काढता पाय घेतला आहे. 2020 च्या दुसर्‍या तिमाहीमध्येच या कंपनीकडून हळूहळू व्यवसाय कमी करायला सुरूवात झाली होती. जगभरात 700 जागा कमी करण्यात आल्या आहेत तर त्याचा परिणाम म्हणून 500 जणांना कामावरून हटवण्यात आले आहे.

कंपनीच्या डिलर नेटवर्ककडून आता भारतातील ग्राहकांना सेवा पुरवली जाणार आहे. भविष्यात त्यांना सपोर्टबद्दल माहिती जाणार आहे. हरियाणा मधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करण्यात आला आहे तर गुडगाव मधील सेल्स ऑफिसदेखील हळू हळू कमी करण्याचा विचार आहे. असे हार्ले डेविडसन कडून सांगण्यात आले आहे.

हार्ले डेविडसन ही भारतातून व्यवहार बंद करणारी अमेरिकेची तिसरी कंपनी आहे. हार्लेच्या एकूण व्यवसायामध्ये एकूण 5% हिस्सा हा भारतामधून येतो. हरियाणा मध्ये ऑगस्ट 2009 साली पहिला प्लांट उभारला होता तर जुलै 2010 मध्ये कंपनीकडून पहिली डिलरशीप सुरू झाली होती.