Dual-Mode Vehicle (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगभरातील वाढते प्रदूषण पाहता बरेचजण खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत असलेले दिसत आहेत. सध्या बस, ट्रेन, मेट्रो असे अनेक सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला जपानच्‍या एका खास कारबद्दल सांगणार आहोत, जी रस्‍त्‍यावर धावण्‍यासोबतच ट्रेनच्‍या रुळांवरही चालताना दिसत आहे. जपानने जगातील पहिले ड्युअल मोड वाहन सादर केले आहे. बससारखे हे वाहन रस्ते आणि रेल्वे ट्रॅक अशा दोन्ही मार्गांवर चालवता येते. शनिवार 25 डिसेंबर रोजी ही रेलबस जगासमोर सादर करण्यात आली आहे.

ही अगदी मिनीबसच्या आकाराची आहे, जी रस्त्यावर धावत असताना रबर टायर वापरेल आणि रेल्वे ट्रॅकवर ही बस स्टीलच्या चाकांवर धावेल. जिथे रस्ते चांगले नाहीत आणि जिथे वाहतुकीची मर्यादित साधने आहेत अशा ठिकाणी ड्युअल मोडचे वाहन वापरले जाऊ शकते. त्याचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास इतका आहे. हा वेग केवळ ऑन-रोड असला तरी, रेल्वे रुळांवर ताशी 60 किलोमीटरचा वेग उपलब्ध आहे. ड्युअल मोडची वाहने संचालित करणाऱ्या Asa Coast रेल्वे कंपनीचे प्रमुख म्हणाले की, हे वाहन वापरण्यास सोपे आहे, याच्या सिस्टममध्ये कोणताही मोठा बदल करावा लागत नाही. (हेही वाचा: महिलेने टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या पुढच्या सीटवर दिला बाळाला जन्म; ओळखले गेले 'टेस्ला बेबी')

या बसमध्ये एकावेळी 21 प्रवासी प्रवास करू शकतात. ही ड्युअल मोड बस दोन्ही प्रकारच्या टायरने सुसज्ज आहे. यात रबर टायर आणि रेल्वे चाके देखील मिळतात. ड्रायव्हर आवश्यकतेनुसार कोणताही मोड चालू करू शकतो. ड्युअल मोड बस अनेक रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि ती डिझेल इंधनावर चालते. ही मिनी बस कम ट्रेन देशातील अनेक लहान शहरांना जोडते. मात्र, जपान याला इतर देशांमध्ये नेणार की स्वत:च्या देशापुरते मर्यादित ठेवणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.