पाकिस्तानी (Pakistan) माध्यमांच्या वृत्तानुसार 26/11 मुंबई हल्ल्याचा (26/11 Mumbai Attacks) मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) मुख्य सूत्रधार झाकी-उर-रहमान लखवीला (Zaki-ur-Rehman Lakhvi) टेरर फंडिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याबद्दल पाकिस्तानच्या पंजाबमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या अटकेचा मुंबई हल्ल्याशी काही संबंध नाही. झाकी-उर-रहमान लखवीने हाफिज सईदसमवेत मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेल्या हल्ल्याचा कट रचला होता. आता आरोप केला जात आहे की त्याने दवाखान्याच्या नावावर मिळालेला निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला.
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर म्हणून काम करणाऱ्या लखवीला 2008 साली संयुक्त राष्ट्र संघाने, मुंबई हल्ल्यानंतर यूएनएससीच्या ठरावानुसार जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मुंबई हल्ल्याबाबतच्या चौकशीदरम्यान समोर आले होते की, लखवीनेच हाफिज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना तयार करून दिली होती. आता आपण लखवीला अटक केली असल्याचे पाकिस्तान म्हणत असला तरी, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडून (FATF) ब्लॅक लिस्टमध्ये येण्यापासून वाचावे यासाठी पाकिस्तान असे डावपेच खेळत असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादाविरोधात कारवाईच्या नावाखाली दहशतवाद्यांना अटक करण्याचे नाटक करीत आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIE) मुंबई हल्ल्यात सामील झालेल्या 11 दहशतवाद्यांची नावे मोस्ट वॉन्टेडच्या नव्या यादीत समाविष्ट केली होती.
26/11 Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi arrested in Pakistan for terror financing, reports ARY News
— ANI (@ANI) January 2, 2021
दरम्यान 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि इंटेलिजेंस एजन्सीच्या मदतीने मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. या दहशतवादी हल्ल्यात अनेक परदेशीयांसह सुमारे 155 लोक ठार झाले होते. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झाकी-उर-रहमान लखवी लखवी असून त्यावेळी त्याला पाकिस्तानमध्ये अटक झाल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले होते. (हेही वाचा: हिंदू मंदिर पाडले प्रकरणी पाकिस्तानात 31 जणांना अटक, मौलानाने उसकवल्याचा आरोप)
या दहशतवादी हल्ल्याला दशकाहून अधिक काळ उलटूनही पाकिस्तानने अजूनही हाफिज मुहम्मद सईद आणि त्याच्या कार्यकर्त्यांना शिक्षा दिलेली नाही. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने दोषींना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे पाकिस्तानी न्यायालयास दिले नाहीत.