जगातील सर्वात वृद्ध पुरुष व्यक्ती (World's Oldest Man) मानले जाणारे ब्राझीलमधील (Brazil) जोस पॉलिनो गोम्स (Jose Paulino Gomes) यांचे निधन झाले आहे. स्थानिक ब्राझिलियन मीडियानुसार, गोम्स 127 वर्षांचे होते. जोस यांनी 28 जुलै रोजी शेवटचा श्वास घेतला. विशेष म्हणजे सात दिवसांनंतर त्यांचा 128 वा वाढदिवस होता. मिनास गेराइस (Minas Gerais) राज्यातील पेड्रा बोनिटा येथील त्यांच्या घरी शुक्रवारी त्यांचे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, गोम्स या वयातही इतले फिट होते की, चार वर्षांपूर्वीपर्यंत ते घोडेस्वारी करत असत.
त्यांचे विवाह प्रमाणपत्र पेड्रा बोनिटाच्या नोंदणी कार्यालयातून प्राप्त झाले आहे. 1917 च्या या विवाह प्रमाणपत्रानुसार, जोस यांचा जन्म 4 ऑगस्ट 1895 रोजी झाला होता. नोंदीनुसार, वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. जर त्यांच्या वयाबद्दलचा दावा बरोबर असेल तर त्याचा अर्थ असा होईल की गोम्स यांचा जन्म राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूपूर्वी झाला होता. अशा प्रकारे ते दोन्ही महायुद्धे आणि तीन जागतिक साथीच्या रोगांपासून वाचले होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, अधिकृतरीत्या सध्या हा रेकॉर्ड स्पेनमधील मारिया ब्रान्यास मोरेरा यांच्या नावावर आहे. त्यांचे वय 115 वर्षे आहे. गोम्सच्या वयाच्या नोंदी मात्र मागील विक्रमाशी विरोधाभास आहेत. माहितीनुसार, सर्वात वयस्कर जिवंत व्यक्ती महिला जीन कॅलमेंट होती, ज्यांचे वयाच्या 122 व्या वर्षी 1997 मध्ये निधन झाले. (हेही वाचा: Japanese Man Transforms Into Dog: अजब! तब्बल 11 लाख खर्च करुन जपानी माणूस बनवला 'हे', सर्वांचे होश उडवणारा व्हिडिओ व्हायरल)
जोस यांची नात, एलियान फरेरा यांनी स्थानिक मीडियाला सांगितले की, ग्रामीण भागात लोक मोठे झाल्यावर त्यांच्या वयाची नोंदणी करतात. त्यामुळे चुकीच्या दस्तऐवजाची अनेक प्रकरणे आहेत. जोस यांच्या शेजारी राहणाऱ्या 98 वर्षीय महिलेने सांगितले, त्या अनेक वर्षांपासून जोस यांना ओळखत आहेत. गोम्स पूर्वी वन्य प्राण्यांना प्रशिक्षण देत असत. माहितीनुसार, त्यांच्यामागे 7 मुले, 25 नातवंडे, 42 पणतवंडे आणि त्यांची 11 मुले असा परिवार आहे.