Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

जगात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घालायला सुरुवात झाल्यानंतर हा व्हायरस नेमका कुठे उगम पावला याचा शोध घेणे सुरु झाले. त्यावेळी चीनच्या (Chine) वूहान (Wuhan) शहरामधून हा विषाणू बाहेर पडला असल्याचे समोर आले होते. मात्र चीनने नेहमीच ही गोष्ट नाकारली आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी याच मुद्द्यावरून चीनवर नेहमीच टीका केली आहे, आता कोरोनाचा जन्म नेमका कुठे झाला? हा विषाणू कुठून आला? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डब्ल्यूओची (WHO) एक्सपर्ट टीम पुन्हा चीनचा दौरा करणार आहे. चीनने सोमवार ही माहिती दिली.

जागतिक आरोग्य संघटनेची तज्ञ टीम कोरोनाचा शोध घेण्यासाठी 14 जानेवारी (गुरुवार) पासून चीन दौर्‍यावर येणार असल्याचे चीनने वृत्त दिले आहे. म्हणजेच अखेर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची चौकशी करण्याचे चीनने मान्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटना तज्ञ टीम चीनमधील कोरोनाशी संबंधित आवश्यक डेटा आणि पुरावे गोळा करेल. मात्र चीन या टीमला वूहान शहराचा दौरा करू देणार का नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चीनच्या वूहान शहरातच 2019 च्या उत्तरार्धात जगातील पहिले कोरोना विषाणूचे प्रकरण समोर आले होते. (हेही वाचा: Coronavirus पेक्षाही 'हे' 7 रोग आहेत अधिक धोकादायक; वैज्ञानिकांकडून सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर)

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपप्रमुख जेंग यिक्सिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डब्ल्यूएचओच्या टीमच्या वुहानच्या भेटीचा कालावधी निश्चित झालेला नाही आणि अद्याप त्यावर चर्चा सुरू आहे. डब्ल्यूएचओ तज्ज्ञ टीमच्या चीन भेटीसाठीची चर्चा बर्‍याच काळापासून सुरू आहे, त्याला आत्ता कुठे चीनने सहमती दर्शवली आहे. डब्ल्यूएचओच्या चौकशीप्रती चीन सकारात्मक असून आपण टीमला सर्व सहकार्य करू असे जेंग यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशाला आशा आहे की अशा संयुक्त प्रयत्नांमुळे भविष्यात विषाणूंचे अधिकाधिक आकलन होण्यास मदत होईल आणि भविष्यात संक्रमक रोगांना रोखता येईल.