
Telangana Student Shot Dead in America: तेलंगणाहून अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय जी प्रवीणच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत गोळ्या घालून हत्या (Telangana Student Shot Dead in America) केल्याचा दावा केला आहे. तथापि, त्याच्या मृत्यूची परिस्थिती अस्पष्ट आहे. प्रवीणचा चुलत भाऊ अरुणने सांगितले की, प्रवीण विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे एमएसचे शिक्षण घेत होता. बुधवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, प्रवीणची हत्या अज्ञात हल्लेखोरांनी दुकानात गोळ्या घालून केली असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु मृत्यूचे कारण कुटुंबाला कळलेले नाही.
अरुणने सांगितले की, प्रवीणने बुधवारी सकाळी त्याच्या वडिलांना फोन केला पण त्याचे वडील झोपले होते. त्यामुळे ते फोन उचलू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच प्रवीणच्या पालकांना धक्का बसला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना सांगितले की, मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर कळेल. हैदराबादमध्ये बीटेकचे शिक्षण घेतलेला प्रवीण 2023 मध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेला गेला. तो डिसेंबर 2024 मध्ये भारतात आला आणि या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेत गेला. (हेही वाचा - Indian Student Shot Dead in US: वॉशिंग्टनमध्ये हैदराबादमधील तरुणाची गोळ्या घालून हत्या)
प्रवीणचे कुटुंब हैदराबादच्या शेजारील रंगा रेड्डी जिल्ह्यातील रहिवासी आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी तेलंगणातील किमान दोन भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यापैकी एका विद्यार्थ्याची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याची जानेवारीमध्ये हत्या करण्यात आली होती.