Cows (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

जगात आपल्या आश्चर्यकारक कारनाम्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चीनने (China) आता एक नवा दावा केला आहे. चिनी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी तीन 'सुपर काउ’ (Super Cows) यशस्वीरित्या क्लोन केल्या आहेत, ज्या सामान्य गायींपेक्षा जास्त दूध देऊ शकतात. ‘सुपर काउ’मुळे चीन दूध उत्पादनात आघाडीवर असलेला देश बनू शकेल, असा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. सुपर काउच्या क्लोनिंगनंतर चीनी डेअरी उद्योगाला गायींच्या सुधारित जाती आयात करण्याची गरज भासणार नाही, असा दावाही सरकारी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे.

चीनने क्लोनिंगद्वारे अशा 3 सुपर गायी तयार केल्या आहेत, ज्या एका वर्षात 17,500 लिटर दूध देऊ शकतात. हे प्रमाण यूके गायींच्या सरासरीपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. तेथे एक गाय एका वर्षात 8 हजार लिटर दूध देऊ शकते. मीडियानुसार, चीनच्या सरकारी वृत्तपत्र निंगजिया डेलीने दिलेल्या वृत्तात दावा केला आहे की, नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल अॅण्ड फॉरेस्ट्री सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 23 जानेवारीला चंद्र नववर्षाच्या काही आठवड्यांपूर्वी गायीच्या तीन बछड्यांचे यशस्वी क्लोनिंग केले आहे.

ब्रिटीश वेबसाइट 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार, चीन या प्रकल्पाद्वारे अशा 1000 सुपर गायींचा समूह तयार करण्याचे स्वप्न पाहत आहे. अशाप्रकारे जगातील सर्वाधिक दूध उत्पादन क्षमतेमुळे चीनमध्ये दुधाचा पुरवठा वाढेल, ज्यामुळे देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यात आणि निर्यात करण्यास मदत होईल.

ज्या गायींमध्ये भ्रूण रोपण करण्यात आले, त्यामधून 3 सुपर गायींचा जन्म झाला असून, येत्या काही दिवसांत 17.5 टक्के गायी जन्माला येणार आहेत. चिनी शास्त्रज्ञाने सांगितले की, ते क्लोनपासून जन्मलेल्या या सुपर गायींच्या टिश्यूचे जतन करतील, जेणेकरून अधिकाधिक सुपर गायी जन्माला येतील. चीनमध्ये सध्या 66 लाख गायी आहेत. यातील सुमारे 70 टक्के गायी विदेशातून आयात करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Mad Cow Disease: नेदरलँडची वाढली चिंता, मॅड काऊ डिसीज ‘BSE’ रोग आढळून आला, गायीची चाचणी सकारात्मक)

अहवालात असे म्हटले आहे की, या गायींचे क्लोनिंग नेदरलँड्समध्ये जन्मलेल्या जास्त दूध देणाऱ्या होल्स्टेन फ्रिशियन जातीच्या गायींच्या क्लोनमधून करण्यात आले आहे. ही नवीन गाय दरवर्षी 18 टन किंवा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन दूध देण्यास सक्षम असतात. यूएस कृषी विभागाच्या मते, 2021 मध्ये हे यूएसमधील सरासरी गायीद्वारे उत्पादित दुधाच्या 1.7 पट जास्त प्रमाण आहे.